Ruchir Sharma Recalls How He Asked To Leave Russia, In Nikhil Kamath Podcast: रॉकफेलर इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि ब्रेकआउट कॅपिटलचे संस्थापक रुचिर शर्मा यांनी व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या वैयक्तिक भेटीचा एक दुर्मिळ अनुभव उघड केला आहे. निखिल कामथ यांच्या पॉडकास्टवर बोलताना, शर्मा यांनी त्यांच्या २०१० च्या रशिया दौऱ्याचे वर्णन केले आहे. जिथे त्यांना व्हीटीबी बँकेने आयोजित केलेल्या एका प्रमुख आर्थिक परिषदेत बोलण्यासाठी आमंत्रित केले होते. रशिया आपल्या आर्थिक विकासाला कसा वेग देऊ शकतो यावर त्यांना राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासमोर स्पष्ट सादरीकरण करण्यास सांगण्यात आले होते.
निखिल कामथ यांच्याशी बोलताना रुचिर शर्मा म्हणाले की, “मला प्रामाणिक राहायला सांगितले होते आणि मी ते गंभीरपणे घेतले. मी सुरुवातीच्या पुतिन यांनी केलेल्या सुधारणा, जसे की रशियामध्ये फ्लॅट टॅक्सची अंमलबजावणी आणि अर्थव्यवस्था स्थिर करण्याचे प्राथमिक प्रयत्न यांचे कौतुक करून सादरीकरणाची सुरुवात केली. मात्र त्यानंतर मी रशियामध्ये जागतिक दर्जाचे ब्रँड्स नसल्याकडे, धनिक उद्योगपतींचे वर्चस्व आणि अर्थपूर्ण मध्यम आकाराच्या व्यवसाय क्षेत्राच्या अभावाकडे लक्ष वेधले.”
सभागृहातील वातावरण बिघडले
दरम्यान रुचिर शर्मा यांना कल्पना नव्हती की, त्यांचे सादरीकरण रशियन टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केले जात आहे. “पुतिन तिथे होते, नोंदी घेत होते, पण त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव दाखवले नाहीत”, अशी आठवणही शर्मा यांनी पॉडकास्टमध्ये सांगितली. रशियन नेत्यांनी शर्मांच्या पुढील भाषणातील काही मुद्द्यांवर सहमती दर्शवली, मात्र तरीही सभागृहातील वातावरण बिघडलेलेच होते.
पार्टी स्पॉयलर
शर्मा यांनी पुढे सांगितले की, “माझ्या सादरीकरणानंतर परिषदेचे आयोजक थंड झाले होते. त्यामुळे काहीतरी चूक झाली आहे हे माझ्या स्पष्टपणे लक्षात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी, मॉर्गन स्टॅनली येथील माझ्या बॉसच्या फोनवरून याला दुजोरा मिळाला. याचबरोबर रशियन सरकारच्या मार्गदर्शनाखाली रशियन प्रेसने शर्मा यांच्याविरुद्ध मीडियामध्ये जोरदार हल्लाबोल सुरू केला होता. “त्यांनी म्हटले की रशियाला आमच्या पैशांची गरज नाही, मी फक्त ‘पार्टी स्पॉयल’ करत आहे”, असे शर्मा म्हणाले.
रशिया सोडण्याचा सल्ला
हे सर्व घडत असताना रुचिर शर्मा यांना ताबडतोब देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता. यानंतर शर्मां ताबडतोब रशियातून परतले होते. “रशियामध्ये पाऊल ठेवण्याची ती शेवटची वेळ होती”, असे शर्मा निखिल कामथ पॉडकास्टमध्ये म्हणाले.
या अनुभवामुळे राजकीय जोखीम आणि सत्तेसह नेते कसे बदलतात याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन बदलला. “पुतिन यांनी भांडवशाहीचे स्वागत करणारे सुधारक म्हणून सुरुवात केली. पण एकदा तेल १०० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले की, त्यांची टीकेची सहनशीलता नाहीशी झाली”, असे शर्मा यांनी नमूद केले.