रिपब्लिकन पक्षाचे नेते विवेक रामास्वामी यांनी बुधवारी UN च्या माजी राजदूत निक्की हॅली यांच्यावर जोरदार टीका केली. विवेक रामास्वामी हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यांच्यात आणि निक्की हॅली यांच्यात तिखट शाब्दिक चकमक पाहण्यास मिळाली. रामास्वामी यांनी चीनच्या अॅपवर बंदी घालण्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना निक्की हॅली यांच्या मुलीवर टीका केली. त्यांची मुलगीही टिकटॉक वापरते. त्यावर निक्की हॅली चांगल्याच चिडल्या. माझ्या कुटुंबाविरोधात काही बोललात तर खबरदार! असं म्हणत निक्की हॅली यांनी रामास्वामी यांना एक प्रकारे इशाराच दिला आहे.

नेमकं हे प्रकरण काय?

निक्की हॅली आणि विवेक रामास्वामी हे एका ‘डिबेट शो’ मध्ये सहभागी झाले होते. तिथे विवेक रामास्वामी यांनी निक्की हॅली यांच्यावर विविध प्रकारचे आरोप केले. त्यांच्या गर्भपाताचा मुद्दाही उपस्थित केला. तसंच त्यांच्या कुटुंबावरही आरोप केले. ज्यानंतर निक्की हॅली चांगल्याच संतापल्या. एवढंच नाही तर विवेक रामास्वामी यांच्या त्यांच्या हाय हिल्सवरही टीका केली. त्यावर निक्की हॅली चांगल्याच चिडल्या आणि म्हणाल्या माझ्या कुटुंबाला या वादात खेचाल तर खबरदार आणि हो मी हाय हिल्स घालते ते फॅशन म्हणून नाही. मला ते ताकद देतात म्हणून मी घालते जो माझा व्यक्तीगत प्रश्न आहे.

कशावरुन रंगली खडाजंगी?

विवेक रामास्वामी आणि निक्की हॅली यांच्यात चीनकडे ज्यांची मालकी आहे अशा अॅपवर बंदी घालण्याच्या प्रश्नावरुन चांगलाच वाद पाहण्यास मिळाला. जेव्हा टिकटॉकचा उल्लेख करत निक्की हॅली यांच्या मुलीवर विवेक रामास्वामी यांनी टीका केली त्यावर त्या म्हणाल्या की मागच्याही वेळी अशाच प्रकारे यांनी माझ्या कुटुंबावर आरोप केले होते. मात्र तुमची मुलगीही हे अॅप वापरत होती हे विसरु नका. माझ्या कुटुंबावर घसरण्याआधी जर स्वतःच्या कुटुंबात काय चाललं आहे ते नीट बघा असाही सल्ला त्यांनी रामास्वामी यांना दिला.