Nishikant Dubey vs Varsha Gaikwad on Controversial Statements : महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या वादात विनाकारण उडी घेऊन ‘मराठी माणसा’ला डिवचणारे भाजप खासदार निशिकांत दुबे सध्या चर्चेत आहेत. ते म्हणाले होते की “जो गरीब माणूस महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी गेला आहे. त्याला मारझोड केली जाते. परंतु, त्यांचं देखील महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत योगदान आहे. राज व उद्धव ठाकरे यांना असं वाटत असेल की दहशतीच्या जोरावर ते राजकारण करू शकतील तर तसं होणार नाही. जर तुम्ही असं करणार असाल तर आम्ही देखील मारू (पटक पटक के मारेंगे, असं दुबे म्हणाले होते).
दुबे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) व शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारंनी मौन बाळगलं. मात्र, महाविकास आघाडीच्या खासदारांनी दुबेंना अद्दल घडवली. महाराष्ट्रातील महिला खासदारांनी संसदभवनात दुबे यांना अचानक गाठून घेराव घालत वादग्रस्त वक्तव्याचा जाब विचारला. तसेच ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी संसद भवनाचा व्हरांडा दणाणून सोडला. महिला खासदारंचा आक्रमक अवतार पाहून दुबेंनी तिथून पळ काढला.
संसद भवनाच्या व्हरांड्यात घडलेल्या घटनेवर दुबे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आज (२९ जुलै) संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा चालू असताना दुबे म्हणाले, “संसदेच्या व्हरांड्यात मजामस्ती होते. परंतु, त्याची बातमी केली जाते.”
दुबे नेमकं काय म्हणाले?
काश्मीर प्रश्न, पहलगामधील दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत चर्चा चालू असताना निशिकांत दुबे बोलू लागले. ते म्हणाले, “काश्मीर अशी जागा होती, जिथे शेख अब्दुल्ला हे राजाने काश्मीर सोडून निघून जावं यासाठी आंदोलन करत होते…” दुबे बोलत असताना विरोधी बाकावर बसलेल्या खासदार वर्षा गायकवाड काहीतरी बोलत होत्या. त्यामुळे दुबे यांना बोलता येत नव्हतं. त्यामुळे ते गायकवाड यांच्यावर संतापले.
“अशा प्रकारे समोरून समालोचन चालू राहिलं तर संसदेचं कामकाज कसं होणार? या वर्षा गायकवाड पाहा, यांना इतकंही माहिती नाही की संसदेच्या व्हरांड्यात मजामस्ती चालते. परंतु, या त्याची बातमी करतात. आम्ही मध्ये बोलू लागलो, अशा प्रकारे समालोचन करू लागलो तर काँग्रेसचे खासदार संसदेत काहीच बोलू शकणार नाहीत.”
दरम्यान, पीठासीन दिलीप सैकिया यांनी वर्षा गायकवाड यांना शांत बसण्यास सांगितलं. सैकिया गायकवाडांना म्हणाले, “तुम्ही तिथे बसून टिप्पण्या करू नका. मी तुम्हाला मध्ये बोलण्याची परवानगी दिलेली नाही. तुम्ही कामकाजात अडथळा आणू नका.”
संसदेच्या व्हरांड्यात नेमकं काय घडलं होतं?
निशिकांत दुबे या भाजपच्या वाचाळवीर खासदाराला बुधवारी मराठी महिला खासदारांनी खिंडीत गाठलं. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदार दुबे यांना शोधत होत्या. दुबे व्हरांड्यात येताच तिघींनी त्यांना घेराव घातला आणि त्यांच्या वक्तव्यंबाबत जाब विचारला.
वर्षा गायकवाड दुबे यांना म्हणाल्या, “मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता? तुम्ही कोणाला आपटून आपटून मारणार आहात? मराठी भाषिकांविरोधातील तुमची ही आरेरावी आम्ही खपवून घेणार नाही” महिला खासदारांचा हा आक्रमक अवतार पाहून निशिकांत दुबे यांनी तिथून पळ काढला. दुबे तिथून निघून जात असताना या महिला खासदारांनी ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी वऱ्हांडा दणाणून सोडला.