निठारी हत्याकांडातील दोषी मोनिंदरसिंह पंधेर आणि सुरिंदर कोली या दोघांना गाझियाबादमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. दुर्मिळातील दुर्मिळ अशी ही घटना असल्याचे सांगत न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
निठारी हत्यांकाडातील २० वर्षाच्या पिंकी सरकार या तरुणीची हत्या आणि तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मोनिंदरसिंह पंधेर आणि सुरिंदर कोलीला न्यायालयाने दोषी ठरवले. या खटल्यात सोमवारी न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने पंधेर आणि कोलीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावताच पिंकी सरकारच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केली. न्यायालयाने कोली आणि पांधेर दोघांनाही दंडही ठोठावला. दोन्ही दोषींमध्ये आता सुधारणेला संधी नसल्याचे सांगत न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.
शनिवारी न्यायालयाने पंधेर आणि त्याचा साथीदार सुरिंदर कोली या दोघांना पिंकी सरकारची हत्या, अपहरण आणि बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवले होते. आत्तापर्यंत १६ पैकी आठव्या प्रकरणात या दोघांना दोषी ठरवण्यात आले आहे. यातील प्रत्येक खटल्यात पंधेरला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पंधेर हा सध्या जामिनावर बाहेर होता. न्यायालयाने शिक्षा सुनावताच पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. या दोघांची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे.
ऑक्टोबर २००६ मध्ये पिंकी सरकार पंधेरच्या घरासमोर जात असताना दोघांनी तिला पकडून घरात खेचले. यानंतर निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली होती. सुनिंदर आणि मोनिंदरसिंह या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला होता. २००५ ते २००६ का कालावधीत पंधेर राहत असलेल्या नोएडातील सेक्टर ३१ मधील लहान मुले, अल्पवयीन मुली आणि तरुणी संशयास्पदरित्या बेपत्ता होत असल्याचे समोर आले होते. चौकशीनंतर पंधेर आणि त्याच्या घरी काम करणाऱ्या सुनिंदर या दोघांनी या हत्या केल्याचे समोर आले होते.