अमरावती : पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते सोनिया गांधींपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी गरिबी दूर करण्याचे स्वप्न दाखवले. मात्र, देशातील गरिबी हटली नाही. गरिबी हटली ती काँग्रेस व राष्ट्रवादीच्या चेल्यांची, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केली.
अमरावतीचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ दसरा मैदानात सभा झाली. यावेळी आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. सुनील देशमुख, प्रकाश भारसाकळे, अरुण अडसड, डॉ. अनिल बोंडे, श्रीकांत देशपांडे, रामदास तडस, अनंत गुढे, महापौर संजय नरवणे आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, देशातील सर्व पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महापालिका, दिल्ली आणि मुंबई सगळीकडची सत्ता काँग्रेसकडे होती. काँग्रेसच्या काळात नेत्यांनी आणि चेल्यांनी वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, वेगवेगळ्या संस्था मिळवल्या. यातून त्यांची गरिबी हटली. पण, देशातील सर्वसामान्य माणूस, दलित, मुस्लीम समाज मागास राहिला. त्यामुळे ही निवडणूक सर्वसामान्यांच्या भवितव्याचा निर्णय करणारी आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार देशात आल्यावर खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, अशी भीती काँग्रेस दलित, मुस्लिमांना दाखवत आहे. वास्तवात आमच्या सरकारने देशात सर्वाधिक जनहिताच्या योजना आणल्या. या योजनांचा लाभ देताना कधीही कोणाची जात किंवा धर्म पाहिला नाही. आज देशाच्या विकासासोबत अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी कणखर नेतृत्वाची गरज आहे. देशाच्या हितासाठी मोदी हेच सक्षम पर्याय आहेत.
गडकरी म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत देशात जो विकास झाला, त्या विकासासोबत मागील ६० वर्षांची तुलना केल्यास एनडीए सरकारने देशात काय काय केले ते दिसून येते. राहुल गांधी ७२ हजार रुपये देण्याचे आश्वासन देत आहेत, त्यांनी २० कलमी, ४० कलमी कार्यक्रमांचे काय झाले हे सांगावे. अमरावती जिल्ह्यात मागील पाच वर्षांत आम्ही १३ हजार कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. यामध्ये सिमेंट रस्त्यांची कामे आहेत. सोबतच जिल्ह्यात तीन हजार कोटी रुपयांची सिंचनाची कामे सुरू आहेत. पंधरा वर्षांपूर्वी बंद पडलेले सिंचन प्रकल्प आम्ही आता पूर्ण करत आहोत. माझ्या खात्याने मागील पाच वर्षांत १७ लाख कोटींची कामे केली आहेत. या देशात पैसा भरपूर आहे. त्यामुळे विकास काम करण्याची दृष्टी आणि तसे कणखर नेतृत्व पाहिजे. ग्रामीण भागात सिंचनाशिवाय चित्र बदलू शकत नाही. त्यामुळे आम्ही सिंचनाचे काम मार्गी लावले आहे आणि लावत आहोत. यापुढे विदर्भातील सिंचन अनुशेषाचा प्रश्न कायम मिटवला जाणार आहे, असे गडकरी म्हणाले.