पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर बेजबाबदार टीका करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी करणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोनच दिवसांत घुमजाव केले असून, आपण अशी कोणतीच मागणी केली नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर बिहार निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर पक्षातील ज्येष्ठ आणि मार्गदर्शक नेत्यांनी व्यक्त केलेल्या मुद्द्यांवर केंद्रीय नेतृत्त्व त्यांच्याशी चर्चा करीत असल्याचेही गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले. नागपूरमध्ये निवेदन प्रसिद्ध करून गडकरी यांनी आपल्या आधीच्या वक्तव्यावरून घुमजाव केले.
ते म्हणाले, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे आमचे आदरणीय नेते आहेत. आतापर्यंत मी किंवा पक्षातील अन्य कोणीही त्यांच्याबद्दल अनादर व्यक्त केलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण मागण्याचा किंवा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. अमित शहा यांच्याकडे मी अशी मागणी केली असल्याचे वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. मात्र, ते पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा या नेत्यांवर कोणतीही कारवाई करण्याचा स्पष्ट शब्दांत विरोध केला आहे. अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, शांताकुमार आणि यशवंत सिन्हा या चार नेत्यांनी गेल्या मंगळवारी पत्रक काढून, मूठभर नेत्यांच्या दावणीला पक्ष बांधण्याची गेल्या वर्षभरातील कार्यपद्धतीच बिहारमधील पराभवाला जबाबदार असल्याचे स्फोटक विधान केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2015 रोजी प्रकाशित
पक्षातील ‘त्या’ ज्येष्ठांवर कारवाईच्या मागणीवरून नितीन गडकरींचे घुमजाव
नागपूरमध्ये निवेदन प्रसिद्ध करून गडकरी यांनी आपल्या आधीच्या वक्तव्यावरून घुमजाव केले
Written by विश्वनाथ गरुड

First published on: 13-11-2015 at 13:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari denied that he had suggested disciplinary action against veterans