Nitish Katara Murder Case Criminal Asks Bail : नितीश कटारा हत्याकांड (२००२) प्रकरणातील दोषी विकास यादव सध्या त्याच्या आजारी आईची देखभाल करण्यासाठी अंतरिम जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे. त्याला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. त्याचा जामीन कालावधी संपण्यापूर्वी त्याने दिल्ली उच्च न्यायालयात पुन्हा एकदा अंतरिम जामीनासाठी अर्ज केला आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी त्याचं लग्न ठरवण्यात आलं असून यासाठीच त्याला अंतरिम जामीन हवा आहे असं त्याने त्याच्या याचिकेत म्हटलं आहे.
यादवने यापूर्वीच त्याला ठोठावलेल्या शिक्षेविरोधात याचिका दाखल केली आहे. लग्नाचं कारण पुढे करत अंतरिम जामिनाची जी नवी याचिका त्याने दाखल केली आहे ती याचिका मूळ याचिकेचाच भाग आहे. न्यायालयाने त्याला कोणतीही सूट न देता २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
नितीश कटाराच्या आईचा न्यायालयाच्या नोटिशीवर आक्षेप
दरम्यान, न्यायालयाने विकास यादवच्या याचिकेवर केंद्र व दिल्ली सरकारकडून उत्तर मागितलं आहे. या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती रवींद्र दुडेझा यांनी यासंबंधी नोटीस जारी केली आहे. मात्र, हत्याकांड प्रकरणातील तक्रारदार महिला व मयत नितीश कटाराची आई नीलम कटारा यांनी यादवच्या याचिकेवर व न्यायालयाच्या नोटिशीवर आक्षेप घेतला आहे.
लग्नासाठी आणखी काही दिवस अंतरिम जामीनासाठी यादवचे प्रयत्न
विकास यादव याने २००२ मध्ये बिझनेस एक्झिक्युटिव्ह नितीश कटारा यांची हत्या केली होती. याप्रकरणी न्यायालयाने विकासला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गेल्या काही वर्षांपासून यादव हा तुरुंगात असून काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात त्याने अंतरिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्याचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. ज्याची मुदत २६ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. २६ ऑगस्ट रोजी विकासला तुरुंगात परतायचं आहे. मात्र, आता त्याने लग्नाचं कारण पुढे करत आणखी काही दिवस जामीन मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
याधवच्या वतीने न्यायालयासमोर हजर झालेले वरिष्ठ अधिवक्ते एन. हरिहरन यांनी उच्च न्यायालयाला सांगितलं की यादव दोन कारणांसाठी जामीन मागत आहे. त्यापैकी एक म्हणजे ५ सप्टेंबर रोजी त्याचं लग्न ठरवण्यात आलं आहे.
कोणीतरी आपली मुलगी मला देतंय : विकास यादव
यादवने न्यायालयाला सांगितलं की मी “५१ वर्षांचा आहे. मी आता आयुष्यात स्थिरावलो नाही तर माझ्यासाठी सगळंच संपून जाईल. अखेर कोणीतरी माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणीतरी आहे, ज्याने आपली मुलगी मला देण्याचा निर्णय घेतला आहे आणि ती मुलगी देखील माझ्याशी लग्न करायला तयार झाली आहे. तसेच मला बदायूं आणि बुलंदशहर येथील माझ्या दोन स्थावर मालमत्ता विकून काही आर्थिक व्यवस्था करायची आहे. जेणेकरून उच्च न्यायालयाने शिक्षेत लावलेला ५४ लाख रुपयांचा दंड भरता येईल. मी दंड भरला नाही तर मला तीन वर्षांचा अतिरिक्त तुरुंगवास भोगावा लागेल.