‘संघमुक्त भारत’ने भाजप संतप्त

नितीशकुमार यांना एक दिवस संघ शाखेवर जाण्याचा सल्ला

नितीशकुमार यांना एक दिवस संघ शाखेवर जाण्याचा सल्ला

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शनिवारी लोकशाही वाचवण्यासाठी संघमुक्त भारताचे आवाहन बिगर भाजप पक्षांना केल्यानंतर भाजपमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. संघाच्या पाठिंब्यासाठी भाजप मैदानात उतरला असून, नितीशकुमार यांनी एक दिवस संघ शाखेवर यावे, म्हणजे गैरसमज दूर होतील, असा सल्ला भाजपने दिला आहे. त्याचबरोबर संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी असे प्रयत्न त्यांच्यावरच उलटतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पाटणा येथील कार्यक्रमात शनिवारी जनता दल (संयुक्त)चे नवे अध्यक्ष नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘काँग्रेसमुक्त भारता’च्या घोषणेला उत्तर देत ‘संघमुक्त भारत’ अशी घोषणा देत बिगर भाजप पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्याला भाजपचे प्रवक्ता श्रीकांत शर्मा यांनी जोरदार उत्तर दिले असून, भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्याच्या प्रयत्नांना आम्ही घाबरत नाही. मोदी सरकारला देशाच्या विकासापासून रोखण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे  स्पष्ट केले. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी काम करण्यास तयार आहेत काय, याचे उत्तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी द्यावे, अशी मागणीही शर्मा यांनी केली. नितीशकुमार यांच्या पक्षाशी भाजपशी दीर्घकाळ आघाडी होती. त्यामुळे संघाच्या लोकांबरोबर तुम्ही दीर्घकाळ काम केले आहे. मात्र आताच संघमुक्त भारत घोषणा कशी देता? त्यापेक्षा थोडा संघ समजावून घ्या, मग तुमचे गैरसमज दूर होतील, अशा शब्दांत शर्मा यांनी टीकेची झोड उठवली. भाजपशी स्वबळावर तुम्ही लढू शकत नाही. एकत्र येण्याने थोडा फार लाभ तुम्हाला मिळेल. मात्र जेव्हा मोठा विरोध होतो तेव्हा संघ वाढल्याचा इतिहास आहे, असा दाखला संघ विचारक मा.गो.वैद्य यांनी दिला आहे. संघ हा कुणाच्या दयेवर नाही स्वयंसेवकांच्या कामावर वाढतो असे त्यांनी स्पष्ट केले.

नितीशकुमार यांनी यापूर्वी काँग्रेसविरोधाचे राजकारण केले. आता ते काँग्रेसबरोबरच जात आहेत. गरिबांच्या भल्यासाठी सरकार काम करत असल्याचे तुम्हाला सहन होत नाही. आम्हाला तुमच्या विरोधाची चिंता नाही. मात्र तुमची उद्दिष्टे यशस्वी होणार नाहीत.

– मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nitish kumar bjp rss

ताज्या बातम्या