बिहारमध्ये राजकीय उलथापालथ सुरू आहे. जदयू, आरजेडी आणि काँग्रेससह असलेली आघाडी तोडून नितीश कुमार पुन्हा भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. इंडिया आघाडीच्या मोटबांधणीकरता नितीश कुमारांची महत्त्वाची भूमिका होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ते इंडिया आघाडीत नाराज होते. त्यातच, आता त्यांच्या भाजापसोबतच्या युतीबाबत चर्चा सुरू झाल्याने इंडिया आघाडीत पुन्हा एकदा फूट पडल्याचं दिसून येतंय. याबाबत समाजवादी पक्षाचे पर्मुख अखिलेश यादव यांनी नितीश कुमारांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या एका खास मुलाखतीत अखिलेश यादव म्हणाले, आघाडीमध्ये पंतप्रधानपदासाठी कोणाचाही विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे योग्य दावेदार असू शकले असते. सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले की कुमार २८ जानेवारीला भाजपच्या पाठिंब्याने अभूतपूर्व नवव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात .

नितीश कुमारांनी इंडिया आघाडीतच राहावं. त्यांनीच पुढाकार घेऊन इंडिया आघाडीची स्थापना केली होती, असंही अखिलेश यादव पुढे म्हणाले. दरम्यान, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीतून काढता पाय घेतल्याने या प्रकरणात काँग्रेसने पुढे यायला हवं होतं, असंही अखिलेश यादव म्हणाले.

हेही वाचा >> लालू प्रसाद यादव यांच्याकडून बहुमताची जुळवाजुळव; जितन मांझींच्या मुलाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर

बिहारमध्ये नेमकं काय घडतंय?

मुख्यमंत्री नितीश कुमार हे पुन्हा एकदा आरजेडीला सोडून भाजपाशी हातमिळवणी करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर लालू प्रसाद यादव यांच्या पाटणा येथील निवासस्थानी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे प्रमुख जीतन मांझी यांच्या पक्षाचे चार आमदार आहेत. जीतन मांझी यांचा पाठिंबा मिळावा यासाठी त्यांचा मुलगा संतोष मांझी याला उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर लालू प्रसाद यादव यांनी दिली आहे. तसेच महगठबंधनमध्ये आल्यानंतर लोकसभेच्या जागाही देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान नितीश कुमार हे पुन्हा एकदा भाजपाबरोबर युती करणार असल्याच्या चर्चा बोत असताना गुरुवारी (दि. २५ जानेवारी) भाजपा नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले. बिहार भाजपाचे अध्यक्ष सम्राट चौधरी, सुशील मोदी आणि विजय कुमार सिन्हा यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे भाजपामधून नितीश कुमार यांचे स्वागत करण्याची अटकळ बांधली गेली. सम्राट चौधरी यांनी मात्र आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी करण्यासाठी आमच्या बैठका सुरू असल्याचे सांगतिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar could have become pm had he stayed in india bloc says akhilesh yadav sgk
First published on: 26-01-2024 at 17:28 IST