बिहारमध्ये जद(यू) आणि राजदमध्ये आघाडी होण्याच्या मार्गात असलेला मोठा अडसर आता दूर झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हेच बिहारमध्ये जद(यू)-राजदचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा सपाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी सोमवारी येथे केली.
राजदचे नेते लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांच्यात ऐक्य झाल्याचा आनंद आहे, नितीशकुमार हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, लालूप्रसाद यांनीच नितीशकुमार यांचे नाव प्रस्तावित केले, लालूप्रसाद हे निवडणुकीचा प्रचारही करणार आहेत, आता कोणतेही मतभेद नाहीत आणि आम्ही मतभेद निर्माण होऊ देणार नाही, असे मुलायमसिंह म्हणाले.
बिहारमधील निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुलायमसिंह यांनी वरील घोषणा केली तेव्हा जद(यू)चे अध्यक्ष शरद यादव आणि लालूप्रसाद यादव हेही हजर होते. आपण स्वत: निवडणूक लढवू शकत नाही आणि आपल्या कुटुंबीयांपैकी मुख्यमंत्रिपदाचा कोणीही दावेदार नाही, असेही लालूप्रसाद म्हणाले.
भेटीचे समर्थन
काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे पक्षाचे भविष्यातील नेते म्हणून उदयास येत असून पक्षाची राजकीय वाटचाल कशी असावी याचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील मुख्य नेते आहेत, असे स्पष्ट करून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे जोरदार समर्थन
केले.
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत जद (यू) आणि राजदसमवेत काँग्रेसलाही महाआघाडीत घ्यावे, अशी योजना होती त्यामुळे आपण राहुल यांची भेट घेतली असे नितीशकुमार म्हणाले.
‘पराभवाच्या भीतीने एकत्र’
बिहारमध्ये एनडीएचा उदय झाल्याने जद(यू) आणि राजदला आघाडी करणे भाग पडले असल्याची टीका भाजपने केली आहे. दोघांची अवस्था ‘बुडत्याला काडीचा आधार’ अशी झाली असून त्यांच्या एकत्रित येण्याने जनतेत भीती पसरली आहे, असेही भाजपने म्हटले आहे.लालूप्रसाद यांच्या जंगल राजपासून वाचण्यासाठी जनतेने जद(यू) आणि भाजप आघाडीला विजयी केले होते, मात्र आता ते दोघे एकत्र आल्याने बिहारमधील जनतेत भीती पसरली आहे, असे भाजपने म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jun 2015 रोजी प्रकाशित
नितीशकुमार मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार
बिहारमध्ये जद(यू) आणि राजदमध्ये आघाडी होण्याच्या मार्गात असलेला मोठा अडसर आता दूर झाला आहे.

First published on: 09-06-2015 at 01:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar is chief ministerial candidate for bihar polls mulayam