पक्षनेतृत्वाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकविणारे बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची पदावरून उचलबांगडी निश्चित झाली आहे. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्याकडे सोपविण्यात येणार आहेत. जद(यू) विधिमंडळ पक्षाची शनिवारी येथे बैठक होणार असून त्यामध्ये नितीशकुमार यांची नेतेपदी निवड केल्याची घोषणा ही  औपचारिकता राहिली आहे. लोकसभेतील पराभवानंतर नितीशकुमार यांच्या जागी मांझी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. मात्र पदाची सूत्रे स्वीकारल्यापासूनच मांझी वादात अडकले आहेत. त्यामुळेच नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदी आणून या वर्षांअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची घडी नीट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.