बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव आणि काँग्रेस यांना मोठा मानसिक धक्का दिला आहे. ३० जून रोजी होणाऱ्या विशेष कार्यक्रमात आणि जीएसटी संदर्भातल्या विशेष अधिवेशनात नितीशकुमार हजर राहणार आहेत. नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निमंत्रण स्वीकारले आहे. ३० जूनला मध्यरात्री संसदेत एक विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनादरम्यान आणि एका विशेष कार्यक्रमात GST लागू केला जाणार आहे. या अधिवेशनावर आणि सरकारच्या कार्यक्रमावर काँग्रेस आणि इतर पक्षांनी बहिष्कार घातला आहे. मात्र या कार्यक्रमाला जायचे मान्य करून नितीशकुमार यांनी सगळ्यांनाच जोर का झटका दिला आहे. त्यामुळे नितीशकुमार यांची ही भूमिका सगळ्याच विरोधकांचा गोंधळ वाढवणारी आहे. याआधी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यावरूनही नितीशकुमार यांनी भाष्य केले होते. मीरा कुमार यांना हरवण्यासाठीच रिंगणात उतरवले का? असा प्रश्न विचारून त्यांनी वाद ओढवून घेतला होता. हा वाद संपतो ना संपतो तोच आता वस्तू आणि सेवा कराच्या कार्यक्रमासाठी आणि उद्याच्या विशेष अधिवेशनासाठी हजर राहण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. या घटनेचे पडसाद आता कसे उमटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातले मतभेद दूर होताना दिसत आहेत. खरेतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आणि नितीशकुमार यांच्यातले मतभेद सगळ्या देशाला ठाऊक आहेत. पण राष्ट्रपतीपदाचे एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देऊन नितीश कुमार यांनी आधीच विरोधकांची झोप उडवली आहे. अशात आता उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला ते हजर राहणार म्हटल्यावर विरोधकांचा ताप वाढला तर आश्चर्य वाटायला नको. त्यांचे परममित्र लालूप्रसाद यादव यांचाही सल्ला त्यांनी ऐकलेले नाही. लालूप्रसाद यादव यांच्या घरी झालेल्या बैठकीत त्यांनी नितीशकुमारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसने निवडलेल्या मीरा कुमार यांना पाठिंबा द्या अशी मागणी केली होती. मात्र ही मागणी नितीशकुमार यांनी धुडकावून लावली. तसेच कोविंद हे चांगले नेते आहेत आणि ते राष्ट्रपतीपदी बसले तर आपल्याला निश्चित आनंद होईल असेही त्यांनी म्हटले होते. ज्यामुळे लालूप्रसाद यादव यांची शिष्टाई अयशस्वी ठरली होती. आता पुन्हा एकदा सरकारचे निमंत्रण स्वीकारून नितीश कुमारांनी विरोधकांना जोर का झटका दिला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.