बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये झालेल्या चर्चेची उत्सुकता सर्वांना होती. राजकीय गणितांबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितलं जात होतं. पण यावेळी मोदींसमोर गंगा नदीत वाढत्या गाळाचा प्रश्न उपस्थित केल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले. गंगा नदीतील गाळ उपसण्याच्या कामाचे मुल्यांकन करण्यासाठी येत्या १० पूर्वी तज्ज्ञांची एक टीम पूर्वेकडील राज्यांत पाठविण्यात येणार असल्याचं आश्वासन यावेळी मोदींनी दिल्याचं नितीश कुमार यांनी सांगितलं.

”मी जेव्हा दिल्लीत आलो. तेव्हा बिहारला सामोरे जावे लागणारे प्रश्नांवर भर द्यायचा असं ठरवलं होतं. त्यात गंगा नदीत वाढणारा गाळ हा मुख्य प्रश्न होता. नदीतील वाढत्या गाळामुळे प्रवाह थांबून नदी पात्रात अश्वच्छता वाढत असल्याचं मी सांगितलं. हा प्रश्न आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा होता.”, असं नितीश कुमार म्हणाले. यासोबतच यंदा पुरस्थिती निर्माण होण्याची भीती देखील आहे. त्यामुळे तज्ज्ञांची एक टीम गंगा नदीतील गाळाचे मुल्यांकन करण्यासाठी पाठवावी अशी विनंती आपण मोदींकडे केल्याचं कुमार म्हणाले.

मोदींनी यावर त्वरित लक्ष देऊन येत्या ३ जून पूर्वीच तज्ज्ञांच्या टीमकडून पाहणी करण्याचे आश्वासन दिले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असंही नितीश कुमार म्हणाले. गाळ व्यवस्थापनाने केवळ नदीतील गाळ उपसण्यावर भर न देता तो प्रवाहासोबत कसा वाहता राहील याचीही काळजी घेतली पाहिजे. याबाबत संबंधित शिपिंग आणि वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याची माहितीही यावेळी कुमार यांनी दिली. याशिवाय त्यांनी बिहारला विशेष पॅकेज जाहीर करण्याचाही मुद्दा उपस्थित केला.