सध्याच्या घडीला नितीश कुमार हेच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी भाजपविरोधात बिगरभाजप पक्षांची महाआघाडी स्थापन करण्याचे सुतोवाच केले होते. या पार्श्वभूमीवर पवार यांचे हे वक्तव्य नव्या राजकीय समीकरणांच्यादृष्टीने सूचक मानले जात आहे. शरद पवार यांनी ‘इकॉनॉमिक टाईम्स’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, सद्य परिस्थितीत बिगरभाजप पक्षांनी भाजपविरोधी आघाडी स्थापन करायची झाल्यास नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे प्रथम दावेदार असतील. काँग्रेसकडे पंतप्रधानपदासाठीचा चेहरा नाही. नितीश हे एका राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे तशी ताकद आहे. भविष्यात बिगरभाजप पक्षांची महाआघाडी अस्तित्वात आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे त्याला समर्थन असेल, असेही पवार यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी शरद पवारांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोनिया यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्ष राहुल गांधी नेतृत्त्व करत असलेल्या काँग्रेसपेक्षा उजवा असल्याचे त्यांनी म्हटले. विरोधी पक्षांमध्ये सोनिया गांधी सर्वमान्य नेत्या आहेत. सोनियाही सर्वांन सोबत घेऊन जाणाऱ्या आहेत. आमच्यापैकी अनेकांशी त्या लढल्या आहेत आणि आम्ही त्यांच्यात होणारे बदल पाहिले आहेत. त्या परिस्थितीशी उत्तमप्रकारे जुळवून घेणाऱ्या असल्याचे सांगत पवारांनी सोनिया गांधींचे कौतूक केले.
लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी करुन निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीचे केवळ चारच खासदार निवडून आले. तर महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ दोन जागांवरच समाधान मानावे लागले होते. तर नितीश कुमार यांनीही भाजपची साथ सोडून एकट्याच्या बळावर निवडणूक लढवली होती. त्यांचे दोन उमेदवार निवडून आले होते.