बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयु नेते नितीशकुमार यांनी राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्यासंदर्भात केलेल्या एका ट्विटमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी राज्यातील युवकांशी ट्विटरवर प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संपर्क साधला. नेटकरांनी विचारलेल्या प्रश्नांची नितीश यांनी उत्तरे दिली. एका नेटकराने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यांची तुलना विषाऱी सापाशी करू पाहिली. नितीश स्वत:ला विकासपुरुष म्हणतात मग लालूंशी हातमिळवणी करून नितीश कसा काय विकास साधणार आहेत?, असा सवाल एका नेटकराने नितीश यांना विचारला. त्यावर उत्तर देताना नितीश यांनी एक दोहा ट्विट केला. चांगल्या व्यक्तीवर वाईट संगतीचा कधीही परिणाम होत नाही. चंदनाच्या झाडाला सापाने वेटोळे घातले तरी चंदन विषारी होत नाही, अशा अर्थाचा दोहा ट्विट करीत नितीश यांनी नेटकराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. यामध्ये नितीश यांनी स्वत:ला चंदन, तर लालूप्रसाद यांना सापाची उपमा दिली.
भाजपचे आव्हान थोपवण्यासाठी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड(जदयु) आणि लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दल(राजद) पक्षाने जवळीक साधली असली तरी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची मने अद्याप जुळलेली नसल्याचे नितीश यांच्या या ट्विटमधून दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.