बिहारच्या राज्यपालपदी रामनाथ कोविंद यांची नियुक्ती करताना आपल्याला विश्वासात घेण्यात आले नाही आणि या नियुक्तीची माहिती आपल्याला प्रसारमाध्यमांकरवी मिळाली, अशा शब्दांत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
आजवरच्या पायंडय़ाप्रमाणे, केंद्र सरकारतर्फे गृहमंत्री हे राज्य सरकारशी, म्हणजे मुख्यमंत्र्यांशी राज्यपालांच्या नियुक्तीबाबत बोलतात. मात्र या नियुक्तीच्या वेळेस माझ्याशी विचारविनिमय करण्यात आला नाही. इतरांप्रमाणे मलाही प्रसारमाध्यमांतून ही माहिती मिळाली, असे कोविंद यांच्या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया विचारली असता नितीशकुमार यांनी सांगितले.
दोन वेळा राज्यसभेचे खासदार राहिलेले ६९ वर्षांचे कोविंद हे कानपूरचे आहेत. बिहार विधानसभा निवडणुकांच्या काही महिने आधीच त्यांची राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. आतापर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे बिहारचा अतिरिक्त कार्यभार होता.
राजकीय परंपरांबाबत माझा आजवरचा अनुभव आणि ज्ञान यांच्या आधारे, अशा नियुक्त्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाते हे मला माहीत आहे, असे नितीश म्हणाले.
नितीशकुमारांसमोर घोषणाबाजी
बिहार विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची असल्याने त्यांनी दिल्लीत स्थायिक झालेल्या बिहारवासीयांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न म्हणून शनिवारी बिहार प्रतिष्ठानच्या दिल्ली शाखेचे उद्घाटन केले.या कार्यक्रमात भाषण करण्यासाठी नितीशकुमार उभे राहताच काही युवकांनी घोषणाबाजी केली. १५ युवकांनी घोषणाबाजी करून ‘नितीश गो बॅक’ असे फलक फडकाविले. प्रसिद्धी मिळविण्याच्या उद्देशाने घोषणाबाजी करणारे युवक आले होते, असे नितीशकुमार म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2015 रोजी प्रकाशित
राज्यपाल नियुक्तीचा निर्णय एकतर्फी
बिहारच्या राज्यपालपदी रामनाथ कोविंद यांची नियुक्ती करताना आपल्याला विश्वासात घेण्यात आले नाही आणि या नियुक्तीची माहिती आपल्याला प्रसारमाध्यमांकरवी मिळाली

First published on: 09-08-2015 at 01:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar upset over appointment of new bihar governor