राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिल्याने नितीशकुमार सरकारने विश्वासदर्शक ठराव सहज जिंकला. ठरावाच्या बाजूने १४० मते पडली.
आवाजी मतदानाने पहिल्यांदा विश्वासदर्शक ठराव संमत करण्यात आला. नंतर सरकारने मतदानाचा आग्रह धरला. त्या वेळी जनता दलाचे मांझी वगळता १०९ सदस्य, राष्ट्रीय जनता दलाचे २४, काँग्रेसचे ५ व भाकप व एका अपक्षाचा पाठिंबा मिळाल्याने सरकारच्या बाजूने १४० मते पडली. पक्षादेश जारी केल्याने सदस्यता जाण्याच्या भीतीने मांझी समर्थकांनी सरकारलाच साथ दिली. ८७ सदस्य असलेल्या भाजपने मतदानावेळी सभात्याग केला. २३३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत १० जागा रिक्त आहेत. चार तास चर्चेनंतर अविश्वास ठराव चर्चेसाठी आला.
जितन राम मांझी यांना माझ्याविरोधात उभे करून राज्यात राष्ट्रपती राजवट लादण्याचा भाजपचा डाव धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकजूट दाखवून उधळून लावला अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी व्यक्त केली. पंतप्रधान होण्याच्या हव्यासापोटी नितीशकुमार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ सोडली असा आरोप विरोधी पक्षनेते नंदकिशोर यादव यांनी केला. सहा महिन्यांनंतर भाजपच बिहारमध्ये सत्तारूढ होणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लादण्याचा आरोप चुकीचा असल्याचे प्रत्युत्तर त्यांनी नितीशकुमारना दिले.