बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडून चार दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. याप्रकरणी सीबीआयने लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित जवळपास १२ जागांवर छापे टाकले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संयुक्त जनता दलाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत तेजस्वी यादव प्रकरणात कठोर पवित्रा स्वीकारणार असल्याचे संकेत नितीश कुमार यांनी दिले.
तेजस्वी यादव यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबद्दल ४ दिवसांमध्ये निर्णय घेतला जावा, असा निर्णय या बैठकीत झाला. तशा प्रकारच्या सूचना तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाला तेजस्वी यादव यांच्या उपमुख्यमंत्रीपदावर ४ दिवसांत निर्णय घ्यावा लागणार आहे. या कालावधीत राष्ट्रीय जनता दलाने निर्णय न घेतल्यास संयुक्त राष्ट्रीय जनता दलाकडून पुन्हा एकदा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.
‘तेजस्वी यादव यांच्या उपमुख्यमंत्रीपदावर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रीय जनता दलाला ४ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे,’ अशी माहिती संयुक्त जनता दलाचे नेते रमई राम यांनी पक्षाच्या बैठकीनंतर दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत नितीश कुमार यांनी भ्रष्टाचाराबद्दल आक्रमक भूमिका घेत याबद्दल कठोर पवित्रा घेण्याचे संकेत दिले. ‘माझ्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी कायम भ्रष्टाचाराविरोधात भूमिका घेतली आहे. मी कधीही भ्रष्टाचार सहन केलेला नाही,’ असे नितीश कुमार यांनी बैठकीत म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली. तेजस्वी यादव यांच्या भविष्यावर राष्ट्रीय जनता दलाने निर्णय घ्यावा, असे संयुक्त जनता दलाला वाटते. ‘भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल तेजस्वी यादव यांनी जनतेला उत्तर द्यावे,’ असे संयुक्त जनता दलाने म्हटले आहे.
राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकीत सर्व आमदारांनी तेजस्वी यादव यांचे समर्थन केले आहे. तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत, असा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे महाआघाडीतील दोन प्रमुख पक्षांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय जनता दलाने पाठिंबा काढल्यास बाहेरुन समर्थन देण्याची ऑफर भाजपकडून संयुक्त जनता दलाला देण्यात आली आहे.