पाकिस्तानी पंतप्रधानांचे प्रतिपादन

हाफीझ सईद ‘साहेबांविरुद्ध’ पाकिस्तानात कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आलेला नसल्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध कारवाई करणार नाही,  असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांनी म्हटले असून, २००८ सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या या सूत्रधाराला निर्दोष ठरवले आहे.

जमात-उद-दावा (जेयूडी) या संघटनेचा प्रमुख असलेल्या सईदला गेल्या नोव्हेंबरमधे पाकिस्तानात नजरकैदेतून मुक्त करण्यात आले होते. त्याने १९८७ साली स्थापन केलेल्या जेयूडीला अमेरिकेने लष्कर-ए-तायबा (एलईटी) या संघटनेची ‘दहशतवादी आघाडी’ घोषित केले होते. एलईटीने २००८ साली मुंबईवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ लोक ठार झाले होते.

जिओ टीव्हीला मंगळवारी दिलेल्या मुलाखतीत अब्बासी यांनी सईदचा उल्लेख ‘साहेब’ किंवा ‘सर’ असा केला. संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी जाहीर केलेल्या सईदविरुद्ध काही कारवाई का करण्यात आली नाही, असे विचारले असता, ‘सईद साहेबांविरुद्ध पाकिस्तानात गुन्हा दाखल नाही. गुन्हा असेल तरच कारवाई होऊ शकते’, असे उत्तर त्यांनी दिले.

नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर, जमात-उद-दावा ही संघटना ‘मिल्ली मुस्लीम लीग’च्या नावाखाली २०१८ सालची सार्वत्रिक निवडणूक लढवणार असल्याचे सईदने सांगितले होते. याबाबत चिंता व्यक्त करून, पाकिस्तानने त्याला पुन्हा अटक करावी असे अमेरिकेने म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानी सरकार सईदच्या पक्षाला मुख्य प्रवाहात का येऊ देत नाही असे विचारले असता, हा सरकारचा निर्णय नसल्याचा दावा करत, निवडणूक आयोग त्याच्या नियमांनुसार काम करते असे अब्बासी म्हणाले. भारतासोबत युद्धाचा धोका नसल्याचे सांगताना, काश्मीरमधे नियंत्रण रेषेवर परिस्थिती चिघळू नये यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करायला हवे, असे मतही पंतप्रधानांनी व्यक्त केले. नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यास पाकिस्तान प्रत्युत्तर देईल हे भारताने समजून घ्यावे, असे ते म्हणाले.