पीटीआय, नवी दिल्ली
‘देश आपल्या शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध क्षेत्राच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. गरज पडल्यास मी मोठी किंमत मोजण्यास तयार आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जाहीर केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे.
देशाच्या हरितक्रांतीचे शिल्पकार कृषीशास्त्रज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित जागतिक परिषदेत मोदी बोलत होते. कच्च्या तेलासाठी रशियावरील अवलंबित्व कमी करून भारतावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील व्यापार शुल्क आणखी वाढवले आहे. अमेरिका मका, सोयाबीन, सफरचंद, बदाम आणि इथेनॉल यासारख्या उत्पादनांवरील कर कमी करून तसेच अमेरिकेतील दुग्धजन्य उत्पादनांसाठी भारतात प्रवेश वाढवू इच्छिते. परंतु भारताने या मागण्यांना विरोध दर्शवला आहे.
स्वामीनाथन यांच्या सन्मानार्थ एक नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय शेतीसाठीचे स्वामीनाथन यांचा दृष्टिकोन मांडताना, पंतप्रधानांनी पोषण सुरक्षा, पीक विविधीकरण आणि हवामान-प्रतिरोधक वाणांच्या विकासाची गरज अधोरेखित केली. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्यक्ष निर्णय समर्थन प्रणाली उपलब्ध करून देण्याची सूचना पंतप्रधानांनी केली.