नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीची पूजा करून घटस्थापना होते आणि प्रारंभ होतो तो नवरात्रीच्या जागरणाला.. हीच सुरुवात असते ती गरबा-दांडियाच्या जल्लोषाची. पण गुजरात सरकारने करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहून यंदा नवरात्रीमध्ये गरबा खेळण्यावर बंदी घातली आहे. गुजरात सरकारने करोना विषाणूची वाढता प्रादुर्भाव पाहून आज, शुक्रवारी सण-उत्सवासाठी नियमावली जारी केली आहे. नवरात्री गरबा, दसरा, दिवाळी, गुजराती नवीन वर्ष आणि शरद पोर्णिमाच्या दिवशी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमासाठी नियमावली जारी केली आहे. नवरात्री उत्सावाला आवघे आठ दिवस शिल्लक राहिले असतानाच गुजरात सरकारने ही नियमावली जाहीर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील सध्याची करोना विषाणूची परिस्थिती पाहता गुजरात सरकारने नवरात्र आणि त्यानंतर येणाऱ्या सण उत्सवासाठी नियमावली तयार केली आहे. १५ ऑक्टोबर २०२० पासून राज्यात हे नियम लागू होणार आहेत. गुजरात सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार, नवरात्रीदरम्यान राज्यात कुठेही गरब्याचं आयोजन करण्यावर बंदी आहे. नवरात्रीमध्ये सार्वजनिक ठिकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा करु शकता. पण, फोटो किंवा मूर्तीला स्पर्श करणे आणि प्रसाद वाटण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच स्थानिक प्रशासानच्या संमतीनंतर देवीच्या मूर्तीची स्थापना करता येईल.

रॅली, रावण दहनाचा कार्यक्रम, शोभा यात्रा आणि रामलीलासारख्या कार्यक्रमात २०० पेक्षा जास्त लोक उपस्थित राहू शकत नाहीत. तसेच या कार्यक्रमासाठी फक्त एक तासांचा वेळ देण्यात आला आहे. नियमांनुसार, कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांमध्ये सहा फूटांचे अंतर असावे. शिवाय मास्कचा वापरही बंधनकारक करण्यात आला आहे. कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवायची असल्यास सॅनिटाजर किंवा हँडवॉश जवळ असावे. कार्यक्रमादरम्यान थुंकल्यास मोठा दंड आकरण्यात येणार आहे. ६० वर्ष किंवा त्यापेक्षा आधिक वय असणाऱ्यांना आणि १० वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या लहानग्यांना कार्यक्रमात येण्यास बंदी आहे. शिवाय गर्भवती महिला आणि इतर आजार असणाऱ्यांनाही कार्यक्रमात येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No garba in gujarat this navratri due to coronavirus nck
First published on: 09-10-2020 at 16:01 IST