Amit Shah Hindu Terrorist Statement: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २१ जुलैपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात सध्या पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर बाबतची दोन्ही सभागृहांत चर्चा सुरू आहे. दरम्यान, राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, “मी गर्वाने सांगू शकतो की, कोणताही हिंदू दहशतवादी होऊ शकत नाही.”
विरोधकांवर निशाणा साधत अमित शहा पुढे म्हणाले की, “विरोधकांच्या राजवटीत बंदुका आणि काडतुसे तर सोडाच, सैन्याकडे हिवाळ्यात काडीपेटीच्या काड्याही नव्हत्या आणि घालण्यासाठी कपडेही नव्हते. आज मोदी सरकारच्या काळात, आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या आपल्या सैन्याने अर्ध्या तासात पाकिस्तानची संपूर्ण हवाई संरक्षण व्यवस्था मोडून काढली.”
“जर पहलगाम हल्ला विरोधी पक्षाच्या कार्यकाळात झाला असता, तर पाकिस्तानला खूप आधीच क्लीन चिट मिळाली असती. आजचा भारत दहशतवादी हल्ल्यांना क्षेपणास्त्रांनी उत्तर देतो, कागदपत्रांनी नाही,” असे शाह पुढे म्हणाले.
विरोधकांवर आरोप करताना शाह म्हणाले की, “त्यांनी मतांसाठी दहशतवादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतातील लोकांनी हा खोटारडेपणा नाकारला.”
निवडणुकीच्या उद्देशाने एक कट
मुंबईत लष्कर-ए-तोयबाने केलेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांसाठी काही पक्षांनी हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरल्याची आठवण करून देत, शाह यांनी म्हटले की काँग्रेस नेते दिग्विजय सिंह हे त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांमध्ये होते.
गृहमंत्री अमित शहा यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांसाठी काही पक्षांकडून हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरण्याच्या प्रयत्नांची आठवण करून दिली. “हे सर्व राजकीय फायद्यासाठी केले गेले. निष्पाप लोकांना तुरुंगात टाकण्यात आले, छळण्यात आले आणि बदनाम करण्यात आले. न्यायासाठी नाही तर निवडणुकीच्या उद्देशाने एक कट रचण्यासाठी”, असे शाह कोणाचेही नाव न घेता म्हणाले.
काँग्रेसचे मतांचे गणित
ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवबाबतच्या चर्चेत बोलताना, शाह यांनी काँग्रेसवर दशकांपासून “तुष्टीकरणाच्या राजकारणाद्वारे” दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आणि भारताची अंतर्गत सुरक्षा कमकुवत करण्याचा आरोप केला.
“या देशात दहशतवाद पसरण्याचे एकमेव कारण म्हणजे तुमच्या (काँग्रेसच्या) मतांचे गणित होते”, असे ते म्हणाले. संसदेवरील दहशतवादी हल्ल्यासाठी दोषी ठरलेल्या अफजल गुरुच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी पी. चिदंबरम गृहमंत्री असताना अनेक वर्षे होऊ शकली नाही, असेही त्यांनी म्हटले.