scorecardresearch

Maharashtra Karnataka Border : सीमावादात हस्तक्षेपास केंद्राची टाळाटाळ?; विरोधी खासदारांची अमित शहांशी भेट नाहीच

सीमावादाचा मुद्दा लोकसभेत गाजल्यानंतर, महाविकास आघाडीच्या खासदारांना भेटण्यासाठी गुरुवारी दिलेली वेळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रद्द केली.

Maharashtra Karnataka Border : सीमावादात हस्तक्षेपास केंद्राची टाळाटाळ?; विरोधी खासदारांची अमित शहांशी भेट नाहीच
गृहमंत्री अमित शाह (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)

नवी दिल्ली: सीमावादाचा मुद्दा लोकसभेत गाजल्यानंतर, महाविकास आघाडीच्या खासदारांना भेटण्यासाठी गुरुवारी दिलेली वेळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रद्द केली. शहा संसद भवनात न आल्याने ही भेट रद्द झाल्याचे सांगितले जात असले तरी, या प्रकरणामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करण्यास टाळाटाळ करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेसच्या लोकसभेतील खासदारांना गुरुवारी दुपारी १२.४० वाजता भेटण्यासाठी वेळ दिली होती. शहा संसदेतील कार्यालयात आले नसून भेट होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही विरोधी खासदारांनी शहांच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिले. हे निवेदन शहा यांना ई-मेलवरही पाठवण्यात आले आहे. या निवेदनामध्ये, बेळगाव, कारवार, निपाणी आदी सीमाभागांतील मराठी भाषकांच्या भावना सविस्तर मांडल्या आहेत. तसेच, तिथे परिस्थिती हिंसक बनली असून केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

कर्नाटक सरकारने आक्रमक भूमिका घेतल्याने बेळगांव व सीमाभागांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून या संदर्भात न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वी एक आठवडा अचानक कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत, अक्कलकोट तालुक्यातील गावांवर हक्क सांगितला. कर्नाटकच्या या घटनाविरोधी भूमिकेमुळे मराठी भाषकांच्या भावना दुखावल्या आहेत. जत तालुक्यातील गावांमध्ये ‘कन्नड वेदिके’च्या कार्यकर्त्यांनी झेंडे घेऊन हुल्लडबाजी केली, महाराष्ट्रातून आलेल्या वाहनांवर दगडफेक केली. बोम्मई यांनी महाराष्ट्रातील लोकांना कर्नाटकमध्ये येण्यास मनाई केली जाईल अशी इशारावजा धमकीही दिली, असे निवेदनात म्हटले आहे.  शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील व काँग्रेसचे बाळू धानोरकर यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

शहांनी वेळ रद्द केली असली तरी, सीमावादाचा प्रश्न गंभीर बनत असून ही बाब प्रकर्षांने केंद्र सरकारपुढे मांडली पाहिजे. या प्रश्नाबाबत महाराष्ट्रातील विरोधी पक्षही तितकाच गंभीर असल्याचे अधोरेखित झाले पाहिजे, या उद्देशाने हे निवेदन देण्यासाठी आम्ही एकत्रितपणे शहांच्या कार्यालयात गेलो, असे महाविकास आघाडीच्या खासदारांनी सांगितले.संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, बुधवारी लोकसभेत सुप्रिया सुळे व विनायक राऊत यांनी शून्य प्रहरात सीमावादाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता. गुरुवारीही शून्य प्रहरात महाविकास आघाडीच्या खासदारांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी, हा दोन राज्यांमधील तंटा असून केंद्र सरकार वा संसद काय करणार, असे म्हणत या विषयावर अधिक चर्चा करण्याची अनुमती नाकारली.

सीमेवर अशांतता निर्माण करण्याचे राजकीय षडयंत्र : फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये अशांतता निर्माण करण्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात राज्य सरकार माहिती गोळा करीत असून लवकरच तपशील उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही राज्यांमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी काही लोक कार्यरत झाले आहेत. मी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोललो आहे. शहा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. शांतता भंग होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचा निर्णय दोन्ही राज्यांनी घेतला आहे. तरीही काही ठिकाणी हिंसक घटना होत असल्याने यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय फडणवीस यांनी व्यक्त केला.

सिद्धरामय्या यांची भाजपवर टीका कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावाद कायम असताना, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी भाजपवर जोरदार टीका केली. सीमावादाचा प्रश्न सोडवण्याऐवजी भाजप राजकीय फायदा उठवत असल्याचा आरोप त्यांनी केला.सिद्धरामय्या यांनी सलग केलेल्या ट्वीटमध्ये प्रसृत केले आहे. ‘‘वादातून राजकीय लाभ मिळवणे हे ‘भाजप कर्नाटक’च्या डीएनएमध्ये आहे. बेळगाव सीमाप्रश्न हा चर्चेद्वारे सोडवता आला असता, तो आता अधिक बिकट करण्यात येत आहे. याद्वारे भाजपला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या