*  निर्मात्याची याचिका फेटाळली
*  सर्वोच्च न्यायालयाची चपराक
मुंबईमधील १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यामध्ये शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत दोषी ठरविण्यात आलेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याला आणखी मुदत देण्याबाबत चित्रपट निर्मात्यांनी केलेली याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने त्याला साडेतीन वर्षांची उर्वरित शिक्षा पूर्ण करण्यासाठी शरण येण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे १६ मेपासून त्याची रवानगी तुरुंगात होणार आहे.

प्रकरण काय?
संजय दत्त भूमिका करीत असलेल्या अनेक निर्मात्यांचे चित्रपट अपूर्णावस्थेत असल्याने त्याबाबत केलेल्या याचिकेनुसार न्यायालयाने एप्रिल महिन्यामध्ये त्याला शिक्षा भोगण्याबाबत एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. १६ मे रोजी ही मुदत संपुष्टात येत असल्याने त्याला उर्वरित शिक्षा भोगावी लागणार
आहे.
संजय दत्तला शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पैकी दीड वर्षांची शिक्षा भोगलेली असल्याने उर्वरित साडेतीन वर्षांचा कारावास भोगण्यासाठी त्याला यापुढे कोणताही दिलासा मिळणार नसल्याचे न्यायालयाने यापूर्वीच १० मे रोजी झालेल्या सुनावणीत स्पष्ट केले आहे.
नवे काय?
संजय दत्त याची भूमिका असलेले दोन चित्रपट अद्याप अपूर्ण आहेत, त्यासाठी या चित्रपटांच्या निर्मात्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये संजय दत्तला शरण येण्यासाठी आणखी काही कालावधी मिळावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये केली.
ही याचिका ऐकून घेण्याचेही नाकारत बी. एस. चौहान आणि दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.