आपल्या देशातील प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचे अविभाज्य अंग असून त्यांच्यावर बाह्य़ नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता नाही, अशी स्पष्टोक्ती भारताचे सरन्यायाधीश पी. सथशिवम यांनी मंगळवारी येथे केली. सहाव्या रामनाथ गोएंका सवरेत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण सथशिवम यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. २०१० या वर्षांसाठी २९ विविध श्रेणींमध्ये देण्यात आलेल्या या पुरस्कारांत द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे वरिष्ठ वार्ताहर जोसी जोसेफ यांना सर्वोत्तम पत्रकाराच्या पुरस्काराने (वृत्तपत्रे) गौरविण्यात आले. जोसेफ यांनी मुंबईतील आदर्श इमारत घोटाळा प्रकरण उघडकीस आणले होते.
प्रसारमाध्यमांविरोधात सध्या काही प्रमाणात नाराजी असून त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी एखादी बाह्य़ यंत्रणा कार्यान्वित करावी, असा एक मतप्रवाह आहे. मात्र, या नाराजीवर हा उपाय नाही. प्रसारमाध्यमांना त्यांच्यावरील जबाबदारीचे भान असून याप्रकारे बाह्य़ नियंत्रण निर्माण केल्यास त्यांच्या स्वातंत्र्याच्या अधिकारावर तो घाला असेल, असे मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केले.   
पत्रकारांनी विवेकबुद्धीने आणि प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. अन्य क्षेत्रांपेक्षा पत्रकारितेचे क्षेत्र वेगळे असून समाज आणि देशाप्रतीच्या जबाबदारीची जाणीव त्यांनी सतत बाळगावी. प्रसारमाध्यमे आणि न्यायसंस्थेने हातात हात घालून काम करण्याची आवश्यकता असून या समन्वयामुळे देशभरातील कोटय़वधी जनतेला न्याय मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. काही पत्रकार आणि वृत्तपत्रे एखादे संवेदनशील प्रकरण अशा प्रकारे रंगवितात की त्या प्रकरणाचा निकाल न्यायालयात लागण्यापूर्वीच ही मंडळी संबंधितांना दोषी ठरवून मोकळी होतात. अशा प्रकारच्या चिथावणीखोर, खळबळजनक आणि पूर्वग्रहदूषित पत्रकारितेपासून तुम्हा सर्वानी दूर राहायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, कृषिमंत्री शरद पवार, दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल, माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आदी अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

वंचितांच्या व्यथा ऐका
या पुरस्कारार्थीना ज्या कारणांसाठी गौरविण्यात आले आहे, त्यातून सर्वानी खूप शिकण्यासारखे आहे. प्रसारमाध्यमातील मंडळी खूप काही बोलत असतात, मात्र आपण सर्वानी त्यापूर्वी ऐकण्याची सवय लावून घ्यायला हवी. देशभरातील ज्या वंचितांचे कोणी ऐकून घेत नाही, ज्यांचा आवाज दबलेला आहे, त्यांची गाऱ्हाणी वाचकांसमोर मांडल्यास ते मोठे कार्य ठरेल, असे प्रतिपादन इंडियन एक्स्प्रेस समूहाचे मुख्य संपादक शेखर गुप्ता यांनी व्यक्त केले.