पीटीआय, वारंगळ : ‘‘एकविसाव्या शतकातील या तिसऱ्या दशकातील प्रत्येक क्षणाचा पुरेपूर वापर केला पाहिजे. देशातील कोणताही भाग वेगवान विकासाच्या शर्यतीत मागे राहता कामा नये. भारत आता जागतिक स्तरावर पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. त्यात तेलंगणवासीयांचा मोठा वाटा आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. तेलंगणमध्ये सुमारे सहा हजार १०० कोटींच्या अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली. यावेळी झालेल्या कार्यक्रमास मोदी संबोधित करत होते. तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.

मोदी म्हणाले, की आज संपूर्ण जग भारतात गुंतवणुकीसाठी इच्छुक आहे. विकसित भारतात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण आहे. तेव्हा तेलंगणासमोर संधी आहेत. आज विविध पद्धतींनी मूलभूत पायाभूत सुविधांसाठी अनेक पटींनी वेगाने काम केले जात आहे. यावेळी दिल्ली अबकारी धोरण घोटाळय़ाचा संदर्भ देत तेलंगणचे सत्ताधारी ‘बीआरएस’ आणि दिल्लीतील ‘आप’ सरकारवर मोदींनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की दोन पक्षांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा आरोप प्रथमच होत आहे.