Nozima Husainova : हमास आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेलं युद्ध अद्यापही संपलेलं नाही. जगातल्या विविध भागांमध्ये या युद्धाविषयी प्रतिक्रिया येत आहेत. काही देश हे इस्रायलची भूमिका योग्य असल्याचं म्हणत आहेत तर काही देश इस्रायलचा विरोध करत आहेत. काही देश पॅलेस्टाईन, हमासचं समर्थन करत आहेत तर काही देश त्यांना चुकीचं ठरवत आहेत. अशा सगळ्यात सिटी बँकेच्या एका महिला कर्मचाऱ्याला इस्रायल विरोधात पोस्ट केल्याने आपली नोकरी गमवावी लागली आहे. इस्रायल आणि हमास युद्धाशी या महिलेचा काहीही संबंध नाही. पण X वर तिने एक पोस्ट केली आणि तिची नोकरी गेली.

नोजिमा हुसाइनोवा काय पोस्ट केली?

नोजिमा हुसाइनोवा असं या महिलेचं नाव आहे. ती सिटी बँकेत काम करत होती. नोजिमा हुसाइनोवाने तिच्या X पोस्टवर लिहिलं हिटलरची कृती योग्यच होती, त्याला या सगळ्या लोकांपासून सुटका हवी होती यात गैर काय? या आशयाची पोस्ट तिने केली. मात्र त्याचा परिणाम असा झाला की तिची नोकरी गेली. नोजिमाने असं काय लिहिलं असा प्रश्न पडला असेल. मात्र नोजिमाचा रोख ज्यू समाजाची जी कत्तल हिटलरने केली त्याकडे होता. नोजिमाने ही पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर लोक सिटी बँकेच्या विरोधात प्रतिक्रिया देऊ लागले. तसंच सिटी बँकेच्या कर्मचाऱ्याने असं कसं काय लिहिलं? असंही विचारु लागले. ही महिला कर्मचारी न्यूयॉर्कमधल्या सिटी बँकेत काम करत होती. तिला तिच्या X पोस्टमुळे कामावरुन कमी करण्यात आलं आहे.

नोजिमाने जी पोस्ट दिली आहे त्यावरुन तिच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी एका युजरने केली. तसंच या पोस्टमधून नोजिमाला काय सांगायचं आहे? बँक तिच्यावर कारवाई का करत नाही असाही प्रश्न विचारला. अशा शेकडो प्रतिक्रिया आल्यानंतर बँकेने काही पोस्टवर उत्तरं देत आम्ही योग्य कारवाई करत आहोत असं सांगितलं. तसंच हेट स्पीच म्हणजेच तिरस्काराची भावना वाढीला लागेल असं कुठलंच वक्तव्य, पोस्ट सिटी बँकेला मान्य नाही असंही सिटी बँकेने स्पष्ट केलं आणि या महिला कर्मचाऱ्याला नोकरीवर काढून टाकलं.एनडीटीव्हीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिटी बँकेने या महिलेला नोकरीवरुन काढून टाकलं आहे याचीही घोषणा एक्सवर केली. त्यानंतर बँकेला काही लोकांनी नावं ठेवली. मात्र बहुतांश लोकांनी बँकेने जे केलं ते योग्यच आहे असं म्हटलं. काही युजर तर म्हणाले की ही ग्रेट न्यूज आहे. काही युजर असंही म्हणाले की अशा प्रकारच्या प्रतिक्रियेवर बँकेने तातडीने कारवाई केली हे खूपच बरं झालं.