पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ नोव्हेंबर रोजी नोएडामधील गौतमबुद्ध नगर येथे जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांबरोबर या वेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित असतील. त्यामुळेच या कार्यक्रमासाठी मोठी तयारी केली जात आहे. कार्यक्रमाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. यामध्ये अगदी सभेसाठी येणाऱ्यांनी कोणत्या पद्धतीने कपडे घालू नये हे सुद्धा सांगण्यात आलं आहे. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाला काळं मास्क, काळे कपडे किंवा काळी टोपी घालून जाण्यास बंदी घालण्यात आलीय.

नक्की वाचा >> “पंतप्रधान मोदी येतायत, चार दिवस खिडकीत कपडे वाळत घालू नका”; पोलिसांचे स्थानिकांना निर्देश

जेवर विमानतळाच्या भूमीपूजनानंतर पंतप्रधान मोदी जेवरमध्ये एका सभेला संबोधित करणार आहेत. या सभेसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आलीय. अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार या सभेसाठी कोणत्याही व्यक्तीला काळं मास्क, काळी टोपी आणि काळे कपडे घालून प्रवेश दिला जाणार नाही. जेवर जिल्ह्यामधील काही स्थानिकांचा या विमानतळाला विरोध आहे. त्यामुळेच हे लोक या कार्यक्रमामध्ये काळा कपडा दाखवून विरोध दर्शवण्याची आणि गोंधळ घालण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते, असं आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटलंय. काही स्थानिकांनी विमानतळाचं नाव सम्राट मिहिर भोज असं ठेवण्यात यावं अशी मागणी केलीय. स्थानिकांचा विरोध आणि या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौतमबुद्ध नगर पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या भागामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. गौतमबुद्ध पोलीस स्थानकाचे पोलीस अधिक्षक अलोक सिंह हे मागील काही दिवसांपासून सतत या सभेसंदर्भातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत.