भारतीय वंशाचे सत्या नडेला मायक्रोसॉफ्टचे सीईओपदी विराजमान झाल्यावर नोकिया कंपनीनेसुद्धा भारतीय वंशाचे राजीव सुरी यांना आपल्या कंपनीचा सीईओ बनविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार 29 एप्रिलला राजीव सुरी कंपनीच्या सीईओपदाची सूत्रे हाती घेतील. नोकियाने मोबाईल फोन व्यवसायाची मायक्रोसॉफ्टला केलेली विक्री अंतिम टप्प्यात आहे. मायक्रोसॉफ्ट आणि नोकियामधील करार पूर्णत्वास आल्यावर ही एकत्रित घोषणा होऊ शकते. आगामी काळात नोकिया नेटवर्क इक्विपमेंट बिझनेसवर आपले लक्ष केंद्रित करणार आहे. येत्या मंगळवारी नोकियाकडून पहिल्या तिमाहीचे निकाल आणि समभागधारकांना देण्यात येणाऱ्या रोख रकमेबाबतच्या निर्णयांची घोषणा करणार आहे. यावेळी नोकियाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर) म्हणून राजीव सूरी यांच्या निवडीबद्दल अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राजीव सुरी यांचे नाव गेली काही वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारीपदासाठी सातत्याने चर्चेत आहे. सुरी यांनी नोकियाच्या नेटवर्क डिव्हिजन, नोकिया सोल्युशन्स आणि नेटवर्कची पुर्नरचना करुन तिला फायदात आणण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.