बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींचं आकर्षण कुणाला नसतं? मात्र अभिनेत्री नोरा फतेही आवडते म्हणून पतीने पत्नीच्या मागे जिमचा तगादा लावला. तू तिच्यासारखी दिसली पाहिजे असं पती पत्नीला सातत्याने सांगायचा आणि तीन तीन तास जिम करायला लावत होता. त्यामुळे हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचलं आहे. उत्तर प्रदेशातल्या लखनऊची ही घटना आहे.

नेमकं हे प्रकरण काय?

लखनऊ येथील एका पोलीस ठाण्यात पत्नीने पतीच्या विरोधात तक्रार नोंदवली. तू नोरा फतेही सारखं दिसलं पाहिजेस म्हणून पती तीन तीन तास जिम करायला लावतो अशी ही तक्रार आहे. समोर आलेलं प्रकरण पाहून गाझियाबाद पोलीसही चकित झाले. तू नोरा फतेही सारखं दिसलं पाहिजे म्हणून माझा पती मला रोज तीन तास जिम करायला लावत होता. मला आता अति व्यायामाचा कंटाळा आला आहे. पतीच्या म्हणण्यानुसार मी तीन-तीन तास जिम केला. पण आता मी त्याच्या हट्टीपणाला वैतागले आहे असं म्हणत या महिलेने व्यथा मांडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

महिलेने नेमकं तिच्या तक्रारीत काय म्हटलं आहे?

महिलेने म्हटलं आहे तिचा बांधा ठिकठाक आहे, तिचा रंगही उजळ आहे. पण तरीही तिच्या शरीराच्या ठेवणीवरुन तिला कधीकधी टोमणे मारले जातात. महिलेने हा आरोपही केला आहे की तिच्या पतीला दुसऱ्या स्त्रियांमध्ये आणि मुलींमध्ये जास्त रस आहे. सोशल मीडियावर तो महिलांचे काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाहात असतो. तसंच तिच्या पतीची ही मूळ अपेक्षा आहे की तिची फिगर नोरा फतेही सारखी झाली पाहिजे त्यासाठी तो तीन तीन तास व्यायाम करायला लावतो ज्याला मी वैतागली आहे आणि पोलिसांत तक्रार करायला आली आहे असंही या महिलेने सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. या प्रकरणात महिलेचा पती, तिची सासू, सासरे, नणंद यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हुंडा उकळल्याचाही पीडित महिलेचा आरोप

पीडितेने असा आरोप केला आहे की तिच्या लग्नात सासरच्या लोकांनी १६ लाख रुपयांचे दागिने, २४ लाखांची महिंद्रा स्कॉर्पियो आणि १० लाख रुपये रोख रक्कम असा हुंडा घेतला आहे. या महिलेचं लग्न ६ मार्च २०२५ ला झालं होतं. महिलेने केलेल्या आरोपांप्रमाणे या लग्नात ७६ लाख रुपये खर्च झाला होता. या प्रकरणी आता पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.