उत्तर कोरियात करोनाचा फैलाव झालेला असतानाच सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर कोरियामधील सरकारी मीडियाने ही माहिती दिली आहे. उत्तर कोरियाने गुरुवारी पहिल्यांदाच करोनाचा रुग्ण आढळल्याची जाहीर कबुली दिल्यानंतर सहा जणांच्या मृत्यूमुळे चिंता वाढली आहे.

KCNA ने दिलेल्या वृत्तानुसार, एप्रिल महिन्यात देशात करोनाचा फैलाव होऊ लागल्यानंतर सध्या १ लाख ८७ हजार ८०० लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत ३ लाख ५० हजार लोकांना लक्षणं दिसली असून यातील १ लाख ६२ हजार २०० लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. सहापैकी मृत्यू झालेल्या एकाला ओमायक्रॉनची लागण झालेली होती.

Covid 19: उत्तर कोरियाने अखेर अडीच वर्षांनंतर दिली कबुली; केली लॉकडाउनची घोषणा

उत्तर कोरियाने देशात आणीबामी जाहीर केली असून अनेक शहरांमध्ये लॉकडाउन लावण्यात आला आहे. हुकूमशाह किम जोंग उन याने मंगळवारी अँटी-व्हायरस कमांड सेंटरला भेट देत आढावा घेतला.

करोनाची सुरुवात झाली तेव्हाच दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्यापासून देशात करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही असा उत्तर कोरियाने याआधी दावा केला होता. महत्वाचे म्हणजे २.५ कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर कोरियात एकही व्यक्तीचं लसीकरण झालेलं नाही. तसंत देशातील आरोग्यव्यवस्था करोनाशी लढण्याइतकी सक्षमदेखील नाही.