एपी, सेऊल : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेण्यासाठी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम उन जोंग मंगळवारी रशियाला पोहोचले. दोन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये किम उन जोंग रशियाकडून आर्थिक मदत आणि लष्करी तंत्रज्ञानाची मागणी करतील अशी अपेक्षा आहे. युक्रेन युद्धासाठी दारूगोळा कमी पडत असलेला रशिया उत्तर कोरियाकडून शस्त्रांसाठी पूरक दारूगोळय़ाची मागणी करण्याची शक्यता आहे.
रशिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांचे पाश्चिमात्य देशांशी संबंध ताणलेले आहेत. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्या दरम्यान अलीकडेच लष्करी युद्धसराव झाला. त्यावेळी किम यांनी आक्रमक भूमिका घेत अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या होत्या. तसेच, दक्षिण कोरियावर क्षेपणास्त्र हल्ल्यांची धमकी दिली होती. दुसरीकडे मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियावर पाश्चिमात्य देशांनी अनेक निर्बंध लादले आहेत.