खासदार किरीट सोमय्या यांना साक्षात्कार

‘पूर्व भारतातून अशा एका नेत्याचा उदय होईल जो भारताला नवी उंची गाठून देईल, अशी भविष्यवाणी फ्रेंच भविष्यवेत्ता सन १५०३ मध्ये केली होती. त्या भविष्यवाणीतील तो नेता म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत,’ असा साक्षात्कार भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या यांना झाला आहे. सोमवारी संसदेत बोलताना सोमय्या यांनी नॉस्ट्राडेमसच्या कथित भविष्यवाणीचा हवाला देत ‘मोदी हेच ते नेते आहेत,’ असे म्हणणे मांडले.

नॉस्ट्राडेमसने लहानपणापासूनच काही गोष्टी प्रतीकात्मक रूपात सांगण्यास सुरुवात केली. त्याचे ते सांगणे म्हणजे भविष्यवाणी व ते खरेही ठरते, अशी एक धारणा आहे. जर्मनीमधील हिटलरशाही, तसेच अगदी अमेरिकेवरील सन २००९ मधील दहशतवादी हल्ला या गोष्टी त्याने आधीच सांगून ठेवल्या होत्या, असे मानणारा मोठा वर्ग आहे. भारतातील पूर्व प्रांतातील एक नेता भारताला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल, असे भाकीत त्याने वर्तविल्याचा हवालाही सातत्याने दिला जातो. याच अनुषंगाने सोमवारी लोकसभेत पूरक मागण्यांवरील चर्चेदरम्यान सोमय्या यांची गाडी नॉस्ट्राडेमस व मोदी यांच्याकडे वळली व त्यांनी ‘तो नेता म्हणजे मोदीच’, असे नमूद केले.

लोकसभेतच सोमय्या यांनी असे वक्तव्य केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. अर्थात, नॉस्ट्राडेमसची भविष्यवाणी व मोदी यांची सांगड घालण्याची ही पहिली वेळ नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही याआधी तशा आशयाची टिप्पणी ‘फेसबुक’वर केली होती.