Pigeon Caught With Bomb Blast Threat Note: गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे सीमेवर सुरक्षा दल सतर्क असल्याचे पाहायल मिळत आहे. अशात आता जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी एका कबुतराला ताब्यात घेतले आहे. या कबुतराजवळ जम्मू रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देणारी चिठ्ठी आढळली. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हे कबूतर पकडले असून, ते आंतरराष्ट्रीय सीमेवरून पाकिस्तानातून आले असल्याचे मानले जात आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या भागातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

या धमकीच्या चिठ्ठीवर उर्दू आणि इंग्रजीमध्ये आयईडी, जम्मू स्टेशन असे लिहिले होते. याशिवाय, “स्वतंत्र काश्मीर” आणि “वेळ आली आहे” अशा ओळीही चिठ्ठीवर लिहिल्याचे आढळल्याचे पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे.

“पाकिस्तानातून आलेले कबूतर १८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता आंतरराष्ट्रीय सीमेवरील कटमारिया भागात पकडण्यात आले. जम्मू रेल्वे स्टेशन उडवून देण्याचा संदेश लिहिलेला एक चिठ्ठी त्याच्या नखांना बांधण्यात आली होती”, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानातून आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारताच्या दिशेने वेगवेगळे संदेश देणारे फुगे, झेंडे आणि कबुतरे पाठवण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. पण, अधिकाऱ्यांनी सांगितले की, धमकीची चिठ्ठी घेऊन येणारे कबूतर पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे, असेही पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.

हे प्रकरण गांभीर्याने घेत, सुरक्षा यंत्रणांनी हा एखाद्याने केलेला खोडसाळपणा होता की सुनियोजित कट होता याचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी रेल्वे स्थानक आणि ट्रॅकभोवती सुरक्षा वाढवली आहे.

शिवाय, श्वान पथके आणि बॉम्ब निकामी करणारी पथके देखील तैनात करण्यात आली आहेत, स्थानिक पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारत-पाकिस्तान तणाव

दरम्यान एप्रिल महिन्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानने सीमेलगतच्या भारतीय शहरांवर हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले होते. जे भारतीय लष्कराने परतावून लावले होते. त्यावेळी दोन्ही देशांदरम्यान मोठा लष्करी संघर्ष निर्माण झाला होता.