Ajit Doval Russia Visit: भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापार कराराबाबत अद्याप सहमती झालेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच रशियाकडून भारत मोठ्या प्रमाणात इंधन आयात करतो, तसेच शस्त्रास्त्र खरेदी करतो, यावर ट्रम्प यांनी आक्षेप नोंदविला होता. यानंतर आता भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे रशियात पोहोचले आहेत. त्यांचा हा नियोजित दौरा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अमेरिकेच्या टॅरिफ वाढीमुळे या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

अजित डोवाल यांच्या रशिया भेटीमागे संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील व्यापाराची चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. रशियातील वृत्त संस्था TASS च्या वृत्तानुसार, अजित डोवाल यांच्या दौऱ्यात भारत आणि रशियातील द्वीपक्षीय भागीदारी, संरक्षण क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित इतर विषयांवर चर्चा होणार आहे. त्यासाठी अजित डोवाल मंगळवारीच मॉस्कोत पोहोचले आहेत.

टासने आपल्या वृत्तात पुढे म्हटले की, अजित डोवाल आणि रशियाचे प्रतिनिधी वरील विषयावर चर्चा करत असताना वर्तमान जागतिक परिस्थिती आणि भू-राजकीय तणाव यावरही चर्चा करू शकतात. याशिवाय भारताला रशियन तेलाचा पुरवठा करण्यासंदंर्भातही चर्चा केली जाऊ शकते.

डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला पुन्हा धमकी

३१ जुलै रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. भारत आणि रशियाची अर्थव्यवस्था मृतावस्थेत असल्याचेही ते म्हणाले होते. युक्रेन-रशिया संघर्षात भारताने भूमिका घेतली नसल्याबद्दलही त्यांनी राग व्यक्त केला होता. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर लक्षणीय प्रमाणात टॅरिफ लादले जाईल, असा इशारा दिला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने काय उत्तर दिले?

दरम्यान अमेरिकेकडून होत असलेल्या आरोपांवर भारतानेही प्रत्युत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, अमेरिका आणि युरोपीय महासंघही रशियाकडून त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी करत आहे. अमेरिका अणुऊर्जा निर्मितीमध्ये लागणारे युरेनियम, विद्युत वाहनांना लागणारे पॅलेडियम आणि खते रशियाकडून आयात करत आहे. त्यामुळे फक्त भारताला लक्ष्य करणे अन्यायकारक आणि अनावश्यक आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे म्हटले.

एस-४०० वरही चर्चा होणार

भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एस-४०० या डिफेन्स मिसाइल सिस्टीम खरेदीवरही चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच भारताची संरक्षण यंत्रणा आणखी बळकट करण्यासाठी रशियाच्या एसयू ५७ या लढाऊ विमानांची खरेदी करण्याबाबतही चर्चा या भेटीत होऊ शकते. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेदेखील २७ आणि २८ ऑगस्ट रोजी रशियाचा दौरा करणार आहेत.