गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये सुरु असणाऱ्या पुरामुळे सध्या परिस्थिती अत्यंत बिघडू लागली. आतापर्यंत या पुरामुळे केरळच्या बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून, अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. एकिकडे निसर्गाचा हा कहर सुरु असतानाच केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठीसुद्धा अनेकजण पुढे सरसावले आहेत. सर्वसामान्यांपासून ते अगदी कलाकारांपर्यंत प्रत्येकजण आपल्या परिने या परिस्थितीत मदतीचा हात पुढे करत आहेत. यामध्ये निपाह व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्या लिनी पुथूसेरी या नर्सच्या पतीनेही आपलं योगदान दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिनीच्या निधनानंतर तिचा पती सजीश याला सरकारी नोकरी लागली. ज्यानंतर त्याने आपल्या नोकरीचा पहिला पगार या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देऊ केला आहे. सार्वजनिक आरोग्य खात्यात कनिष्ठ लिपिक या पदावर जवळपास महिनाभरापूर्वीपासून सजीश काम पाहू लागला होता. यापूर्वी तो बाहरीनमध्ये नोकरी करायचा. पण, पत्नीच्या निधनानंतर मुलांच्या संगोपनासाठी त्याने परदेशातील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आपली समाजाप्रती असणारी जबाबदारी ओळखतच त्याने हे अतिशय स्तुत्य असं पाऊल उचललं असून, मुख्यमंत्र्यांकडून सुरु करण्यात आलेल्या मदतनिधीमध्ये आपलंही योगदान दिलं आहे.

वाचा : केरळ विकास समितीच्या ‘हेल्मेट सक्ती’ जनजागृतीचे शतक

बुधवारीच त्याने कामगार मंत्री टी.पी. रामकृष्णन यांची भेट घेतली असून, मदतीसाठीचा चेक त्यांच्या स्वाधीन केला. सध्याच्या घडीला अनेकांनीच आपल्या मदतीचा ओघ केरळच्या दिशेने वळवला असून, तेथील परिस्थिती सुधारण्याच्या दिशेने काही पावलं उचलली आहेत. दरम्यान, विविध ठिकाणी पुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्यांनीही जोर धरला आहे. आता पर्यंत केरळातील जवळपास ३५ धरणांमधील पाण्याची पातळी वाढली असून, शनिवारपर्यंत तेथे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीमुळे केरळातील बऱ्याच ठिकाणी घरे वाहून गेली असून रस्त्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे तर हवाई आणि रेल्वे वाहतुकीवरही त्याचा गंभीर परिणाम झाला आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nurse lini puthussery husband sajeesh donates first salary for kerala flood victims
First published on: 17-08-2018 at 10:06 IST