रिपब्लिक पक्षाचे माजी सिनेट सदस्य चक हेगेल यांची अमेरिकेचे संरक्षणमंत्री म्हणून तर बराक ओबामा यांचे दहशतवादविरोधी लढय़ातील सल्लागार जॉन ब्रेन्नन यांची सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रेन्नन यांनी ‘ऑपरेशन जेरोनिमो’ या लादेनवरील कारवाईच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
विद्यमान संरक्षणमंत्री लिऑन पॅन्न्ोटा यांची जागा आता ६६ वर्षीय हेगेल घेतील, असे व्हाईट हाऊसच्या सूत्रांनी स्पष्ट केले. ब्रेन्नन हे सन २००८ पर्यंत सीआयएच्या सौदी अरेबियातील केंद्राचे प्रमुख होते. २००८ मध्ये त्यांनी बराक ओबामा यांच्या निवडणूक प्रचारात सहभाग घेतला होता आणि त्यानंतर ते ओबामा प्रशासनाचे अविभाज्य घटक झाले होते. सीआयएचे प्रमुख निवृत्त जनरल डेव्हिड पेट्रियस यांचे विवाहबाह्य़ संबंध उघड झाल्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
हिलरी क्लिंटन यांनी परराष्ट्रमंत्री होण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे ओबामा प्रशासनाने या पदावर सिनेट सदस्य जॉन केरी यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर, ओबामा प्रशासनाने केलेल्या या दोन सर्वात महत्त्वपूर्ण नियुक्त्या आहेत.
 संरक्षणमंत्री म्हणून हेगेल यांच्यासमोर एकीकडे अफगाणिस्तानातील युद्ध संपुष्टात आणणे, आशिया-पॅसिफिक प्रदेशांत अमेरिकेचे निर्णायक स्थान टिकवून ठेवणे, तर दुसरीकडे अर्थसंकल्पातील संरक्षण विषयक खर्चात केली जाणारी कपात हाताळणे अशी, अनेक आव्हाने आहेत. हेगेल हे नेब्रास्का येथील खासदार असून १९९७ ते २००९ या कालावधीत ते सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्य होते. विशेष म्हणजे, भारत-अमेरिका अणू करार प्रकरणी त्यांनी भारताच्या बाजूने मतदान केले होते. युद्धादरम्यान जखमी झालेले तसेच व्हिएतनाम युद्धात सहभागी असलेले आणि संरक्षणमंत्रिपद मिळवलेले हेगेल हे पहिले व्यक्तिमत्त्व आहे.दोन्ही नवीन नेमणुकांबद्दल विश्वास व्यक्त करताना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या नवीन प्रमुख सहकाऱ्यांना योग्य ती दिशा आणि नवीन आयाम मिळवून देतील असे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obama choses hagel as def sec and brennan as cia chief
First published on: 09-01-2013 at 01:03 IST