नवी दिल्ली : काँग्रेसचे अपात्र खासदार राहुल गांधी यांनी मोदी आडनावाचा नव्हे तर, संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला असून त्यांच्याविरोधात देशभर मोहीम राबवणार आहे.

भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही राहुल गांधींना ओबीसीविरोधी ठरवले असून शुक्रवारी सलग चार ट्वीट करून त्यांनी शरसंधान साधले. ‘राहुल गांधी अत्यंत अहंकारी आहेत. पण, त्यांची आकलनक्षमता खूपच कमी आहे. स्वत:च्या राजकीय लाभासाठी त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. ओबीसी समाज तसेच न्यायालयाने त्यांना वारंवार समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना माफी मागण्याचा पर्यायही देण्यात आला होता. मात्र, राहुल गांधींनी त्याकडे दुर्लक्ष केले’, असे ट्वीट करून नड्डा यांनी भाजपच्या ओबीसी नेत्यांना राजकीय संदेश दिला आहे.

संसद भवनामध्ये केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी भाजपच्या मंत्र्यांची बैठक घेतली असून त्यांच्या वतीने राहुल गांधींचा जाहीर निषेध केला जाणार असल्याचे सांगितले जाते. धर्मेद्र प्रधान, प्रल्हाद पटेल, रामेश्वर तेली आदी मंत्र्यांचा बैठकीत समावेश असल्याचे समजते. ओबीसी हा भाजपचा प्रमुख मतदार असून या निमित्ताने ओबीसी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केल्याचे मानले जात आहे.  केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव यांनाही, राहुल गांधींनी ओबीसींचा अपमान केल्याची टीका केली आहे. मोदी समाजाला चोर म्हणण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला, अशी टीका त्यांनी केली.

जातीचे राजकारण : काँग्रेसचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधींविरोधातील निकालाचा वापर भाजप जातीच्या राजकारणासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेसचे पक्षाध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. ललित मोदी, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी सार्वजनिक बँकेचे पैसे लुटले आणि ते परदेशात पळून गेले. ही लूटमार ओबीसींनी केलेली नाही. मग, ओबीसी समाजाचा अपमान कसा झाला, असा प्रतिप्रश्न खरगे यांनी केला.