Odisha Crime News: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. बालासोर जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने कॉलेजमधीलच एका शिक्षकाविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली होती. पण तिने तक्रार केल्यानंतरही त्या तक्रारीकडे कोणीही लक्ष दिलं नाही. त्यामुळे त्या विद्यार्थिनीने कॉलेजच्या आवारातच स्वतःला पेटवून घेतलं होतं. यामध्ये ती विद्यार्थिनी जवळपास ९० टक्के भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या विद्यार्थिनीने एका वरिष्ठ प्राध्यापकावर लैंगिक छळाचे आरोप केले. पण या आरोपानंतर कॉलेज प्रशासनाने निष्क्रियता दाखवली. संबंधित प्राध्यापकावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे तिने स्वतःला पेटवून घेतलं. या घटनेनंतर संबंधित शिक्षकासह प्राचार्यांनाही संबंधित विद्यालयातून निलंबित केलं. तसेच घटना घडली त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी संबंधित तरुणीने आरोप केलेल्या शिक्षकाला अटक केलं होतं. दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी आता आणखी मोठी कारवाई करत कॉलेजच्या प्राचार्यांनाही अटक केलं आहे.
या घटनेनंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. तसेच या विद्यार्थिनीने कॉलेजमधील एका प्राध्यापकांकडून अनेक महिन्यांपासून होत असलेल्या गैरवर्तन आणि धमक्यांबाबत एक पत्र लिहित कारवाईची मागणी केली होती. पण तिच्या या पत्राकडे किंवा तक्रारीकडे कॉलेज प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे आता अनेकांनी संतप्त सवाल केले आहेत. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
दरम्यान, त्या विद्यार्थिनीने तक्रार केल्यानंतर कॉलेज संबंधित शिक्षकावर सात दिवसांत कारवाई करेल असं तिला सांगण्यात आलं होतं, अशी माहिती आता समोर येत आहे. मात्र, तरीही कोणतीही कारवाई झाली नाही आणि त्यानंतर या विद्यार्थिनीने कॉलेजच्या आवारातच स्वतःला पेटवून घेतलं होतं. आता या संपूर्ण घटनेबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेबाबत ओडिशा राज्याचे उच्च शिक्षण मंत्री सूर्यवंशी सूरज यांनी सांगितलं आहे की या घटनेत जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे की, या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. अनेक पथके पुरावे गोळा करत आहेत. जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की महाविद्यालयाने तिला तक्रार पुढे नेण्यापासून रोखलं होतं. तसेच महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समितीच्या सदस्यांनी आणि मुख्याध्यापकांनी त्या मुलीला तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला होता असा आरोप आता तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.