Odisha Crime News : देशातील विविध शहरांमधून दररोज अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्याच्या बातम्या समोर येतात. कधी संपत्तीचा वाद, तर कधी घरगुती हिंसाचार किंवा कधी-कधी किरकोळ वादातून थेट खून झाल्याच्याही घटना घडतात. मात्र, आता ओडिशामधून एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका तरुणाने अल्पवयीन प्रेयसीचं अपहरण केल्याची घटना घडली, त्यानंतर त्या तरुणीवर त्याच्या चार मित्रांनी बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं घटना काय घडली?
ओडिशामधील मयूरभंज जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचे तिच्या प्रियकर आणि चार मित्रांनी अपहरण केलं. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ ऑगस्ट रोजी घडली. अल्पवयीन मुलीचा प्रियकर आणि त्याचे मित्र तिला ट्यूशन क्लासला जात असताना पर्यटनाचे आमिष दाखवून जवळच्या जंगलात घेऊन गेले होते.
त्यानंतर त्या चारही जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथून मुलगी पळून जाण्यास यशस्वी झाली आणि तिने जाऊन तिच्याबरोबर झालेल्या प्रकाराची माहिती घरच्यांना दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबाने उडाला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केलं असून यातील आणखी काही आरोपी फरार झाले आहेत. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी पोलिसांनी सांगितलं होतं की ओडिशाच्या अंगुल जिल्ह्यातील जंगली भागात एका आदिवासी महिलेवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश होता.