Odisha govt engineer raided : ओडीशाच्या दक्षता संचालनालयाने (Vigilance Directorate) शुक्रवारी एका राज्य सरकारच्या इंजिनियरच्या घरावर छापेमारी केली. या कारवाईत या इंजिनियरकडून कोट्यवधींच्या संपतीसह २.५६ कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, या इंजिनियरच्या निवृत्तीच्या फक्त एक दिवस आधी हा छापा टाकरण्यात आला आहे.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुवनेश्वर येथील या इंजिनियरच्या घरावर जेव्हा छापा टाकण्यात आला तेव्हा त्यांनी फ्लॅटच्या खिडक्यांमधून ५०० रूपयांच्या नोटांचे बंडल्स बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न केला. अधिकार्‍यांनी सांगितले की, ग्रामीण विकास विभागातील मुख्य इंजिनियर वैकुंठनाथ सारंगी यांच्याशी संबंधित अंगुल, भुवनेश्वर आणि पिपिली येथील सात ठिकाणच्या वेगवेगळ्या मालमत्तांवर दक्षता संचालनालयाच्या पथकांनी एकाच वेळी छापे टाकले. सारंगी यांच्यावर त्यांच्या माहिती असलेल्या उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचा आरोप होता. या आरोपांच्या चौकशीदरम्यान ही कारवाई करण्यात आली.

छापेमारीत काय सापडलं?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये दोन बहुमजली इमारती, दोन फ्लॅट, दोन महागडे प्लॉट, १.५ कोटींचे डिपॉझिट, शेअर्स आणि म्युच्युअल फंडमधील २.७ कोटींची गुंतवणूक, १.१ किलोपेक्षा जास्त सोने आणि जवळपास १५ इंपोर्टेड घड्याळे यांचा समावेश आहे.
इतकेच नाही तर अजूनही शोध सुरू असल्याने अजून जास्त मालमत्ता उघड होण्याची शक्यता आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षता विभागाचे संचालक यशवंत कुमार जेठवा म्हणाले की, “जप्त केलेली मालमत्ता ही बेहिशोबी असल्याचे दिसून येते. विश्वसनिय माहिती मिळाल्यानंतर आम्ही शोध मोहिम राबवली.”

जेठवा पुढे बोलताना म्हणाले की, अधिकारी येताना पाहिल्यानंतर सारंगी यांनी भुवनेश्वर येथील त्यांच्या फ्लॅटच्या खिडक्यांमधून ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल्स फेकून देण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी या प्रकरणात चौकशीस सुरू असल्याचेही सांगितले. तसेच या अभियंत्याला शनिवारी अटक केली जाऊ शकते असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिकृत नोंदणीनुसार, सारंगी यांनी १९९१ साली स्टायपेंडरी इंजिनियर म्हणून सरकारी नोकरीत प्रवेश केला. यावेळी त्यांना २,००० दर महिना पगार मिळत होता. राज्यातील वेगवेगळ्या विभागांमध्ये विविध पदांवर काम केल्यानंतर त्यांची बढती अतिरिक्त मुख्य अभियंता म्हणून जानेवारी २०२३ मध्ये झाली आणि त्यानंतर या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ते मुख्य अभियंता बनले होते.