भारताच्या संसदेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य आणि १९५२ साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून सलग सात दशके खासदार म्हणून काम केलेले रिशांग केईशिंग यांनी वयाच्या ९५ वर्षी सार्वजनिक जीवनातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे.
रिशांग केईशिंग हे सध्या राज्यसभेचे सदस्य असून एप्रिलमध्ये त्यांची खासदारकीची मुदत संपुष्टात येत आहे. म्हणून त्यानंतर सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हायची वेळ आता आली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
‘‘मला वाटते सार्वजनिक जीवनात खूप काळ काम केले असून आता निवृत्त व्हायला हवे,’’ असे केईशिंग यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्यसंग्रामापासून देशाच्या राजकारणात झालेल्या अनेक उलथापालथींचे केईशिंग हे साक्षीदार आहेत.