देशात करोनाच्या तीन लाखांपेक्षा जास्त दैनंदिन रुग्णसंख्या नोंदवली जात आहे. तर, ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. करोनाचा ओमायक्रॉन प्रकार देशात समुह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचला आहे. आणि त्याचा परिणाम अनेक महानगरांमध्ये दिसून येत आहे, कारण शहरांमध्ये नवीन प्रकरणे वेगाने वाढत आहेत. INSACOG ने आपल्या ताज्या बुलेटिनमध्ये ही माहिती दिली आहे.

दुसरीकडे ओमायक्रॉनचा उप-प्रकार BA.2 देखील देशात आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे. INSACOG ने रविवारी प्रसिद्ध झालेल्या १० जानेवारीच्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, ओमायक्रॉनची आतापर्यंतची बहुतेक प्रकरणे लक्षणे नसलेली किंवा सौम्य आहेत. सध्याच्या लाटेमध्ये हॉस्पिटलायझेशन आणि आयसीयूची प्रकरणे वाढली आहेत आणि जोखीम पातळीत कोणताही बदल झालेला नाही, असंही सांगण्यात आलंय.

ओमायक्रॉन आता भारतात समुह संसर्गाच्या प्रसारणाच्या स्थितीत आहे आणि अनेक महानगरांमध्ये रुग्ण वेगाने वाढत आहेत. INSACOG ने आपल्या ३ जानेवारीच्या बुलेटिनमध्ये, म्हटले होते की “ओमायक्रॉनचा प्रसार सर्वात जास्त दिल्ली आणि मुंबईमध्ये होत आहे. भारतात ओमायक्रॉनचा पुढील प्रसार आता परदेशी प्रवाशांद्वारे नव्हे तर अंतर्गत संक्रमणाद्वारे होणे अपेक्षित आहे,” असंही म्हटलं होतं.

गेल्या २४ तासांत देशभरात ३ लाख ३३ हजार नवीन करोनाबाधित…

देशभरात करोना महमारीची तिसरी लाट आलेली आहे. दैनंदिन रूग्ण संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे, शिवाय करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. मागील २४ तासात देशात ३ लाख ३३ हजार ५३३ नवीन करोनाबाधित आढळून आले, ही संख्या कालच्या तुलनेत ४ हजार १७१ रूग्णांनी कमी आहे. तर,५२५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय मागील २४ तासात २ लाख ५९ हजार १६८ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या २१ लाख ८७ हजार २०५ आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १७.७८ टक्के आहे.