जगभरात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याचं चित्र दिसत आहे. दिवसोंदिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये ओमायक्रॉनचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत ८९ देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आलेत. भारतामध्येही ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाकळण्यासाठी निर्बंध लागू करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. त्यातच आता ओमायक्रॉनमुळे करोनाची तिसरी लाट देशात येणार का यासंदर्भातील चर्चा सुरु झाल्यात. असं असतानाच आता तज्ज्ञांनी भारतामधील करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात भाकित व्यक्त केलंय.

संशोधकांचं म्हणणं काय?
कानपूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात अभ्यास केलाय. आयआयटी कानपूरच्या संशोधकांनुसार ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भावामुळे देशात लवकरच करोना संसर्गाची तिसरी लाट येणार आहे. ३ फेब्रुवारीपर्यंत करोनाच्या या तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाईल असंही संशोधकांनी म्हटलं.

कोणत्या पद्धतीचा वापर केला?
कानपूर आयआयटीमधील या संशोधकांनी भारतामधील करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात हा निष्कर्ष गॉजियन मिक्सर मॉडल या स्टॅटिस्टीकल टूलच्या माध्यमातून काढलाय. ऑनलाइन प्रीप्रिंट सर्व्हर मेडीरेक्व्हीने प्रकाशित केलेल्या या अहवालामध्ये जगभरातील करोना संसर्गाच्या ट्रेण्डचा अभ्यास करण्यात आलाय.

नक्की वाचा >> संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?

या अभ्यासाच्या आधारे भारतामध्ये करोनाची तिसरी लाट डिसेंबरच्या मध्यपासून सुरु होईल असं दिसत असल्याचं संशोधकांनी म्हटलंय. करोनाची ही तिसरी लाट फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये सर्वाधिक उंच्चाकावर (म्हणजेच पीकवर) असेल असंही अहवालात म्हटलंय.

नक्की वाचा >> लोकसत्ता विश्लेषण : ‘डेल्मिक्रॉन’ म्हणजे काय? तो किती घातक आहे?, भारतीयांना त्याचा धोका किती?

कोणती माहिती वापरली?
संशोधकांनी भारतामधील करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यानची आकडेवारी आणि सध्या वेगवेगळ्या देशांमध्ये असणाऱ्या ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येच्या आधारे माहिती गोळा करुन निष्कर्ष काढला आहे. याच माहितीच्या आधारे तिसरी लाट कधी येईल यासंदर्भातील अंदाज व्यक्त करण्यात आलाय. यापूर्वीही आयआयटीच्या संशोधकांनी फेब्रुवारी महिन्यात करोनाची तिसरी लाट येईल असा अंदाज व्यक्त केलेला.

नक्की वाचा >> करोनाची दहशत वाढत असतानाच दिल्लीतून दिलासादायक वृत्त; डॉक्टर म्हणाले, “ओमायक्रॉनबाधितांना पॅरासिटेमॉल…”

एका दिवसाला किती रुग्ण आढळून येणार?
करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील हा गणितीय निष्कर्ष बनवण्याच्या कामात सहभागी असलेले आयआयटीचे संशोधक मनिंद्र अग्रवाल यांनी डिसेंबरच्या सुरुवातीलाच ओमायक्रॉनमुळे करोनाची तिसरी लाट फेब्रुवारीत येईल असं भाकित व्यक्त केलेलं. फेब्रुवारीमध्ये या लाटेचा सर्वाधिक प्रभाव जाणवेल. लाटेचा सर्वाधिक प्रभाव असताना देशात दिवसाला एक ते दीड लाख रुग्ण आढळून येतील असा अंदाज अग्रवाल यांनी व्यक्त केलाय.

नक्की वाचा >> एक दोन नाही तर त्याने तब्बल आठ वेळा घेतली करोनाची लस… कारण ऐकून पोलिसही चक्रावले

एकमेव दिलासादायक गोष्ट
मात्र अग्रवाल यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार एकमेव दिलासादायक गोष्ट म्हणजे तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असण्याची शक्यात आहे. डेल्टा व्हेरिएंटप्रमाणे ओमायक्रॉनमुळे प्रकृतीला अधिक त्रास होत असल्याची प्रकरणं अद्याप समोर आलेली नाही.

भारतात सध्या ओमायक्रॉनचे रुग्ण किती?
भारतामध्ये शुक्रवारी (२४ डिसेंबर २०२१ रोजी) सकाळी आठ वाजता पूर्ण झालेल्या २४ तासांमध्ये करोनाचे एकूण सहा हजार ६५० नवीन रुग्ण आढलून आले. देशामध्ये ओमायक्रॉनबाधितांची संख्या ३५८ वर पोहचली आहे. महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक म्हणजे ८८ रुग्ण आहेत, दिल्लीत ६७, तेलंगणमध्ये ३८, तामिळनाडूमध्ये ३४, कर्नाटकमध्ये ३१, गुजरातमध्ये ३० ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळून आलेत.

नक्की वाचा >> Coronavirus: वुहान लॉकडाउननंतरचा चीनचा सर्वात मोठा निर्णय; १ कोटी ३० लाख लोकसंख्येचं संपूर्ण शहरच केलं क्वारंटाइन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केरळमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या २७ असून राजस्थानमध्ये २२, हरयाणामध्ये आणि ओडिशामध्ये प्रत्येकी चार जणांना ओमायक्रॉनची बाधा झालीय. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश प्रत्येकी तीन ओमायक्रॉनचे रुग्ण असून उत्तर प्रदेशमध्ये दोन ओमायक्रॉनबाधित आहेत. याचप्रमाणे चंढीगड, लडाख आणि उत्तरखंडमध्ये प्रत्येकी एका रुग्णाला ओमायक्रॉनची बाधा झालीय.