जम्मूच्या सीमेवर आणखी ३ ड्रोन

मंगळवारी सकाळी रत्नुचाक, कालुचाक व कुंजवानी भागांवर एक ड्रोन आढळून आले.

जम्मू : जम्मू शहराच्या सीमेवर तीन ठिकाणी मंगळवारी रात्री तसेच बुधवारी पहाटे आणखी ड्रोन दिसून आल्यामुळे पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणांपुढील चिंता आणखी वाढली.

पहिले ड्रोन मंगळवारी रात्री ९ वाजून २३ मिनिटांनी मिरान साहिब येथे दिसले. दुसरे व तिसरे ड्रोन कालुचाक व कुंजवानी भागांमध्ये बुधवारी पहाटे अनुक्रमे ४.४० वाजता व ४.५२ वाजता दिसून आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. रविवारी सकाळी जम्मूतील भारतीय हवाई दलाच्या तळावर ड्रोन हल्ला झाल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशात या आठवड्यात दररोज ड्रोन दिसून आले आहेत.

मंगळवारी सकाळी रत्नुचाक, कालुचाक व कुंजवानी भागांवर एक ड्रोन आढळून आले. आदल्या दिवशी, सोमवारी कालुचाक व रत्नुचाक येथील लष्करी तळांवर ड्रोन उडत असल्याचे दिसल्यानंतर लष्कराच्या जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यामुळे ते परत फिरले. सैनिकांच्या दक्षतेमुळे एक मोठा धोका टळल्याचे लष्कराचे जनसंपर्क अधिकारी ले.क. देवेंदर आनंद यांनी सोमवारी सांगितले होते. तथापि, गेले तीन दिवस अनेक भागांमध्ये शोध घेऊनही सुरक्षा दले एकाही ड्रोनचा शोध लावू शकलेली नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: On the border of jammu city 3 more drones akp