पीटीआय, नवी दिल्ली : अनेक राज्यांनी बनलेले भारत हे एक संघराज्य असून, ‘एक देश, एक निवडणूक’ ही संकल्पना भारतीय संघराज्यासह सर्व राज्यांवर हल्ला असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी केली. देशात लोकसभा आणि सर्व राज्यांचे निवडणुका एकाच वेळी घेण्याची शक्यता अजमावून पाहण्यासाठी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापल्यानंतर राहुल गांधी यांनी ही टीका केली.

काँग्रेसने रविवारी स्पष्ट केले, की ‘एक देश, एक निवडणूक’ या उच्चस्तरीय समितीची वेळ अत्यंत संदिग्ध आहे आणि तिच्या संदर्भातील अटींनी आधीच त्यांच्या शिफारसी निश्चित केल्या आहेत. त्याच वेळी, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वरील नमूद केले आहे, की एक देश, एक निवडणूक ही उच्चस्तरीय समिती एक औपचारिक कृती आहे. यासंदर्भात निवडलेली वेळ अत्यंत संशयास्पद असून, त्याच्या संदर्भातील अटींनी आधीच शिफारसी निश्चित केल्या आहेत.

हेही वाचा >>> काश्मीर, अरुणाचल आमचेच!; चीन, पाकिस्तानला पंतप्रधान मोदी यांनी ठणकावले

कोविंद यांची अधिकाऱ्यांबरोबर चर्चा

नवी दिल्ली :  लोकसभा, राज्यांच्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या प्रस्तावाची तपासणी करण्यासाठी व शिफारशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी रविवारी या संदर्भात प्राथमिक माहिती दिली. कोविंद हे समितीपुढील अजेंडय़ावर कसे काम करतील हे समजून घेण्यासाठी विधि सचिव नितेन चंद्र, विधिमंडळ सचिव रीता वशिष्ठ आणि इतरांनी रविवारी दुपारी त्यांची भेट घेतली, असे समजते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष अधिवेशनापूर्वी विरोधकांची बैठक

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी ‘इंडिया’ आघाडीतील सहकारी पक्षांच्या खासदारांची बैठक ५ सप्टेंबरला बोलावली आहे. १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या विशेष अधिवेशनासाठी विरोधी पक्ष त्यांचे डावपेच निश्चित करतील. खरगे यांच्या राजाजी मार्ग येथील निवासस्थानी ही बैठक होईल.