कुलभूषण जाधवप्रकरण ताजे असतानाच पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये एका भारतीय नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. प्रवासासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्याला अटक केल्याचे पाकमधील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने भारत- पाकसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव कायम असतानाच दुसरीकडे इस्लामाबादमध्ये एका भारतीयाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नबी शेख असे या तरुणाचे नाव असून तो मुंबईचा रहिवासी असल्याचे एनडीटीव्हीने म्हटले आहे. परदेशी नागरिक कायदा १९४६ अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पाकमधील न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. इस्लामाबादमधील भारतीय दुतावासाने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही.