नैसर्गिक वायू आणि तेल कंपनी अर्थात ONGCच्या तीन कर्मचाऱ्यांचं अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आसाममधील शिवसागर जिल्ह्यात असलेल्या लकुआ क्षेत्रातील रिंग साईटवरून कर्मचाऱ्यांचं अपहरण करण्यात आलं असून, उल्फाच्या सशस्त्र बंडखोरांनी हे कृत्य केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुधवारी पहाटे ही घटना घडली. ज्या गाडीतून कर्मचाऱ्यांचं अपहरण करण्यात आली, ती सापडली असून, कर्मचाऱ्यांचा उद्याप शोध घेतला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ONGCच्या ट्विटर हॅण्डलवर काही ट्विट्सच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे. दोन कनिष्ठ सहायक अभियंते आणि कनिष्ठ तंत्रज्ञ अशा तीन कर्मचाऱ्यांचं अपहरण करण्यात आलेलं आहे. शिवसागर जिल्ह्यातील (आसाम) लकुआ येथील रिंग साईटवर २१ एप्रिल रोजी पहाटेच्या वेळी ही घटना घडल्याचं कंपनी व्यवस्थापनानं म्हटलं आहे.

अज्ञात बंडखोरांनी कर्मचाऱ्यांचं अपहरण करताना ONGCच्या गाडीचा वापर केला. ही गाडी आसाम-नागालँडच्या सीमेजवळ आढळून आली. सीमेजवळ असलेल्या निमनगढ जंगलाजवळ अपहरकर्त्यांनी ही गाडी सोडून दिली. याप्रकरणी ONGC प्रशासनानं स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक प्रशासनाने घटनेची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर हालचालींना वेग आला असून, ओएनजीसी प्रशासन वरिष्ठ यंत्रणांच्या सातत्याने संपर्कात आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. या अपहरणामागे बंदी घातलेल्या यूनाटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (स्वतंत्र) अर्थात उल्फा-आय या संघटनेचा हात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली असून, संशयित परिसरांना वेढा टाकण्यात आला असल्याची माहिती शिवसागरचे पोलीस अधीक्षक अमितवा सिन्हा यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ongc employees abducted by suspected extremist group in assam bmh
First published on: 21-04-2021 at 10:38 IST