जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून पंतप्रधानांची प्रशंसा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड जनादेश मिळाला असल्यामुळे केवळ तेच काश्मीरचा प्रश्न सोडवू शकतात, असे सांगून जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी त्यांना काश्मीर खोऱ्याला दलदलीतून बाहेर काढण्याचे आवाहन केले.
आपले वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या राजवटीदरम्यान पूर्वीच्या रालोआ सरकारने जम्मू-काश्मीरसाठी आखलेले धोरण कायम ठेवण्यात यूपीए सरकार अपयशी ठरल्याने लोकांच्या मनात जो संताप साठलेला होता, त्यामुळेच राज्यात सध्याची परिस्थिती दिसत असल्याचे काश्मीर खोऱ्यातील वाढत्या निदर्शनांना तोंड देत असलेल्या मेहबूबा म्हणाल्या.
आज मी एक गोष्ट अधिकारवाणीने सांगणार असून त्यासाठी माझ्यावर टीकाही होऊ शकते. जम्मू-काश्मीरच्या समस्येवर जर कुणी तोडगा शोधू शकणार असेल, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत. त्यांना मजबूत जनादेश मिळाला आहे. ते जो काही निर्णय घेतील, त्याला देश पाठिंबा देईल असे राज्यात भाजपसोबत आघाडीचे सरकार चालवत असलेल्या मुफ्ती म्हणाल्या.सध्याच्या दलदलीतून जर कुणी आम्हाला बाहेर काढू शकत असेल, तर ते पंतप्रधान मोदी हेच आहेत, असे येथील एका उड्डाणपुलाचे उद्घाटन केल्यानंतर मेहबूबांनी सांगितले. २५ डिसेंबर २०१५ रोजी लाहोरला स्वत:हून भेट देण्याचा मोदी यांचा निर्णय कमकुवतपणाचा नव्हे, तर ताकदीचा निदर्शक होता असे सांगून त्यांनी पंतप्रधानांच्या या निर्णयाची प्रशंसा केली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात पाकिस्तानला भेट देण्याचे धैर्य नव्हते, असा टोलाही त्यांनी हाणला.