operation sindoor aftermath : जम्मू आणि काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावंर हल्ले केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा भारत सरकारकडून करण्यात आला आहे. यानंतर भारतीय सैन्याने लाहोरच्या जवळपासचे पाकिस्तानी लष्कराचे एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली आहे. यादरम्यान आज भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी आज सुरक्षा दलाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा भारताची भूमिका स्पष्ट केली. दोन देशांमधील वाढलेल्या तणावाबद्दल बोलताना मिस्त्री यांनी तणाव यापुढे वाढवणे हे पूर्णपणे पाकिस्तानच्या हातात असल्याचे म्हटले आहे.

परराष्ट्र सचिव मिस्री यांनी पाकिस्तानने पहलगाम येथे हल्ला करून तणावाला सुरुवात केल्याचा मुद्दा मांडला. तसेच त्यांनी पुढील तणाव वाढवण्याबद्दलचा निर्णय हा पाकिस्तानचा असेल असेही म्हटले आहे “तणाव वाढण्याबाबत आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. येथे दोन मुद्दे आहेत, पहिला पाकिस्तानने २२ एप्रिल रोजी तणाव वाढवण्यास सुरूवात केली आणि आम्ही फक्त त्याला प्रत्युत्तर देत आहोत. आम्ही कालही सांगितलं आणि आजही माझ्या सहकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आता जर पाकिस्तानकडून आणखी तणाव वाढवण्याचा प्रयत्न झाला तर त्याला योग्य प्रकारे प्रत्युत्तर दिले जाईल आणि म्हणून त्याबद्दलचा निर्णय पूर्णपणे पाकिस्तानचा असेल,” असे मिस्री म्हणाले.

पाकिस्तानच्या हल्ल्यांनना चोख प्रत्युत्तर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज सुरक्षा दलाकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विंग कमांडर व्योमिका सिंग, कर्नल सौफिया कुरेशी यांनी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याबद्दल माहिती दिली. “७-८ मे च्या रात्री, पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू , पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टमने हे लक्ष्य निष्क्रिय केले. या हल्ल्यांचे अवशेष आता अनेक ठिकाणांहून सापडत आहेत जे पाकिस्तानी हल्ल्यांचे पुरावे आहेत”, असं सुरक्षा दलाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. भारताने पाकिस्तानप्रमाणेच त्याच क्षेत्रात प्रत्युत्तर दिले आहे. लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आले आहे”, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.